शिक्षक भारतीचे धरणे आंदोलन, प्रशासनाचे लक्ष वेधले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2018 01:36 PM2018-04-22T13:36:36+5:302018-04-22T13:36:36+5:30
आंतरजिल्हा बदली शिक्षकांना कार्यमुक्त करावे याकडे जिल्हा परिषद प्रशासनाचे वारंवार लक्ष वेधूनही प्रशासनाने त्यांना कार्यमुक्त केलेले नाही.
ओरोस : आंतरजिल्हा बदली शिक्षकांना कार्यमुक्त करावे याकडे जिल्हा परिषद प्रशासनाचे वारंवार लक्ष वेधूनही प्रशासनाने त्यांना कार्यमुक्त केलेले नाही. त्यामुळे या शिक्षकांना तत्काळ कार्यमुक्त करावे या मागणीकडे जिल्हा परिषद प्रशासनाचे पुन्हा एकदा लक्ष वेधण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक भारतीच्या वतीने आंतरजिल्हा बदलीग्रस्त शिक्षकांसमवेत जिल्हा परिषद भवनासमोर एक दिवसाचे धरणे आंदोलन छेडण्यात आले.
सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक भारती संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष पाताडे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी लक्ष्मीकांत कराड, अरुण पवार यांच्यासह मोठ्या संख्येने आंतरजिल्हा बदली झालेले शिक्षक उपस्थित होते. सिंधुदुर्गातील ३३६ शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या झाल्या आहेत. त्यापैकी २३६ शिक्षकांना पतीपत्नी एकत्रीकरणअंतर्गत कार्यमुक्त करण्यात आले आहे. असे असले तरी २३६ शिक्षकांना अद्यापही कार्यमुक्त करण्यात आले नाही.
या शिक्षकांना कार्यमुक्त करावे यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक भारतीच्यावतीने वारंवार आंदोलने करून, निवेदन देऊन जिल्हा परिषद प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले होते. मात्र बदल्या होऊन अनेक महिने झाले तरी प्रशासनाने त्यांना अद्याप कार्यमुक्त केलेले नाही. त्यामुळे बदली झालेल्या शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. प्रशासनाच्या या अन्यायकारक कार्यपद्धतीबाबत या शिक्षकांमध्ये असंतोष धुमसत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांसमवेत प्राथमिक शिक्षक भारतीने शनिवारी जिल्हा परिषद भवनासमोर एक दिवसाचे धरणे आंदोलन छेडले.