शिक्षकांवरचा राग निघाला ‘बांधकाम’वर
By admin | Published: October 19, 2015 10:48 PM2015-10-19T22:48:31+5:302015-10-19T23:48:59+5:30
निकृष्ट कामावरून हल्लाबोल : सावंतवाडी टोपीवाला आयटीआयमध्ये काँग्रेसचे आंदोलन
सावंतवाडी : टोपीवाला आयटीआयमध्ये शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवत नसल्याच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी गेलेल्या काँग्रेसने आयटीआयची इमारत बांधूनही गेली चार वर्षे हस्तांतरण न झाल्याने बांधकामच्या उपविभागीय अभियंता अनामिका जाधव यांच्यासह ठेकेदार बी. एन. मूर्ती यांना धारेवर धरले. यावेळी नवीन इमारतीच्या पार्किंगमध्ये स्वत:च्या गाड्या उभ्या करून ठेवल्याने मूर्ती यांच्यावर फौजदारी दाखल करण्याची मागणीही यावेळी पदाधिकाऱ्यांनी केली.
सावंतवाडी पोलीस ठाण्याजवळ असलेल्या टोपीवाला आयटीआयमध्ये विद्यार्थ्यांना शिकवले जात नसल्याच्या तक्रारीवरून काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजू परब, युवक लोकसभा मतदार संघ अध्यक्ष आनंद शिरवलकर, डॉ. जयेंद्र परूळेकर, सभापती अंकुश जाधव, उपसभापती महेश सारंग, सुधीर आडिवरेकर, गौरांग रेगे, सुनील पेडणेकर आदी जाब विचारण्यासाठी गेले होते.
यावेळी प्राचार्य एस. के. वायदांडे यांच्याकडे चार आयटीआयचा कार्यभार असल्याने ते सावंतवाडीत हजर नव्हते. त्यामुळे प्रभारी प्राचार्य आर. जी. कोकणे यांना काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जाब विचारला. जोपर्यंत प्राचार्य वायदांडे यांना बोलावले जात नाही तोपर्यंत येथून हलणार नसल्याचा पवित्रा पदाधिकाऱ्यांनी घेतला. आयटीआयची बांधण्यात आलेली दुसरी इमारत बंद असल्याचे पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. तसेच इमारतीच्या बाहेर ठेकेदाराने गाड्यांचे गोडावून केल्याचे पाहून काँग्रेस पदाधिकारी आणखी आक्रमक झाले. जोपर्यत या ठिकाणावरून गाड्या हलवल्या जात नाहीत तसेच ठेकेदार मूर्ती यांच्यावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. अखेर आंदोलनस्थळी बांधकामच्या अभियंता अनामिका जाधव दाखल झाल्या. जोपर्यंत ठेकेदार मूर्ती हे आयटीआयमध्ये येत नाहीत, तोपर्यंत आम्ही येथून हलणार नसल्याचे स्पष्ट केले. ठेकेदार मूर्ती आल्यावर त्यांच्यावर पदाधिकाऱ्यांनी प्रश्नांचा भडिमार केला. यावेळी जाधव यांनी लगेच गाड्या काढल्या जातील, असे स्पष्ट केल्याने पदाधिकारी शांत झाले.
बांधलेली इमारत पाहण्याचा अट्टाहास पदाधिकाऱ्यांनी धरत त्याच इमारतीत ठेकेदाराला कोंडून ठेवण्याचा इशारा दिला. मात्र, बराच कालावधी ठेकेदार व अभियंत्यांना नव्या इमारतीची चावी मिळाली नाही. अखेर दगडाने कुलूप फोडण्याचे ठरवले. (प्रतिनिधी)
चावी नसल्याने कुलूप फोडण्याचा प्रयत्न
काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतीची पाहणी करण्याचे ठरवले. मात्र, चावी नसल्याने अखेर ठेकेदार बी. एन. मूर्ती यांनी दगडाने कुलूप फोडण्याचा प्रयत्न केला.
काँग्रेसने आयटीआयच्या इमारतीवरून ठेकेदार मूर्ती यांना चांगलेच धारेवर धरले. त्यानंतर तळवणे पूल तसेच अन्य कामावरूनही काँग्रेस पदाधिकारी आक्रमक झाले होते.
मूर्ती यांना जिल्ह्यात काम करू देणार नाही. ते काम कसे करतात ते आम्ही बघतो. त्यांनी कोणाचाही आधार घ्यावा, असे आव्हानही संजू परब यांनी दिले.
अभियंता जाधव यांनी २९ आॅक्टोबरला अधिकारी तसेच आयटीआयचे शिक्षकांसमवेत बैठकीचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.