शिक्षक समितीचे येत्या सोमवारी कोकणभवन समोर धरणे आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2022 12:49 PM2022-02-25T12:49:39+5:302022-02-25T12:50:10+5:30
कणकवली : कोकण विभागातील जिल्ह्यांपैकी सिंधुदुर्ग , रत्नागिरी जिल्ह्यातील सद्यस्थितीत शिक्षकांच्या १४ ते १५ टक्के रिक्त असलेल्या जागा शिक्षक ...
कणकवली : कोकण विभागातील जिल्ह्यांपैकी सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातील सद्यस्थितीत शिक्षकांच्या १४ ते १५ टक्के रिक्त असलेल्या जागा शिक्षक भरतीने तत्काळ भरण्यात याव्यात. यासह अन्य मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्यावतीने विभागीय आयुक्त कार्यालय कोकण भवनसमोर येत्या सोमवारी (दि. २८) सकाळी १० वाजल्यापासून राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
अशी माहिती संघटनेचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष नितीन कदम यांनी येथील पत्रकार परिषदेत दिली. या आंदोलनात कोकणविभागासह राज्यातील हजारो आंतरजिल्हा बदली शिक्षक सहभागी होणार आहेत.
यावेळी शिक्षक समितीचे राज्य उपाध्यक्ष राजन कोरगावकर, जिल्हा सरचिटणीस सचिन मदने, राज्य सहसचिव नामदेव जांभवडेकर, कोकण विभाग उपाध्यक्ष शरद नारकर, कार्याध्यक्ष नारायण नाईक, प्रवक्ता सुनिल चव्हाण, कणकवलीतिल शिक्षक नेते गिल्बर्ट फर्नांडिस, कणकवली तालुकाध्यक्ष विनायक जाधव, श्रीकृष्ण कांबळी आदी उपस्थित होते.
नितीन कदम म्हणाले, या आंदोलनात सिंधुदुर्गातील अनेक आंतरजिल्हा बदली बांधव व शिक्षक समितीचे कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर या कोकण विभागातील जिल्ह्यांमध्ये आंतरजिल्हा बदली संबधाने गेल्या ६ वर्षापासून विविध गंभीर प्रश्न निर्माण झालेले असून या प्रश्नांबाबत संघटनेने सातत्याने जिल्हास्तर ते राज्यस्तरापर्यंत पाठपुरावा केलेला आहे.
परंतु सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये आंतरजिल्हा बदली टप्पा क्रमांक १,३,४ मधील सुमारे ४५० शिक्षक सन २०१६ पासून कार्यमुक्तीच्या प्रतिक्षेत आहेत. या दोन्ही जिल्ह्यांमध्ये रिक्त पदांचे प्रमाण १० टक्के पेक्षा जास्त आहे. त्यामुळे शासनाच्या आंतरजिल्हाबदली टप्पा क्रमांक ५ मध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांचा समावेश होण्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून या जिल्ह्यांमधील कार्यरत आंतर जिल्हा बदली शिक्षकांमध्ये कमालीचा असंतोष निर्माण झाला आहे.