शाळा बंद ठेवत शिक्षकांचा मोर्चा
By admin | Published: December 12, 2014 10:07 PM2014-12-12T22:07:42+5:302014-12-12T23:51:58+5:30
महाराष्ट्र राज्य शिक्षण हक्क कृती समितीच्यावतीने ओरोस रवळनाथ मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
ओरोस : शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना नियमबाह्य पद्धतीने अतिरिक्त ठरविल्याने शासन आदेश मागे घ्यावेत या मागणीसाठी जिल्ह्यातील सर्व शाळा बंद ठेवत जिल्ह्यातील शिक्षक संघटनांनी शुक्रवारी ओरोस रवळनाथ मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. महाराष्ट्र राज्य शिक्षण हक्क कृती समितीच्यावतीने ओरोस रवळनाथ मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी ई. रविंद्रन यांना सादर करण्यात आले. यावेळी सिंधुदुर्ग शिक्षण संस्थाचालक मंडळाचे सचिव जी. एम. सामंत, शिक्षण भारतीचे संजय वेतुरेकर, शिक्षकेत्तर संघटनेचे प्रसाद पडते, अध्यापक संघाचे नारायण माने यांच्यासह सुमारे बाराशेहून अधिक शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी सहभागी झाले होते.
पटसंख्येचे निकष लावून शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना अतिरिक्त ठरविण्याचा घाट शासनाने घातला असल्याने अनेक शाळांमधील शिक्षक कमी होण्याची भीती निर्माण झाली आहे. हे शिक्षक कमी झाल्यानस विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवरही परिणाम होणार आहे. शिक्षण हा विद्यार्थ्यांना घटनेने व कायद्याने दिलेला अधिकार आहे. यानुसार त्यांना शिक्षण मिळणे हा अधिकाराचाच एक भाग आहे. ही बाब दुर्लक्षित होत असल्याने त्याकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.
शासनाने २00७ मधील तरतुदीचे योग्य पालन करुन संच मान्यतेचे निकष नव्याने निश्चित करावेत, तोपर्यंत सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना मूळ शाळेतच कार्यरत ठेवावे. तसेच आॅनलाईन आॅफलाईन वेतन काढण्याच्या नवीन धोरणामुळे अनेक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे हक्क तसेच संस्था चालकांची त्यांच्या विद्यालयाची विविध पदे गमवावी लागत आहे. या बाबींकडेही त्यांनी यावेळी लक्ष वेधले आहे.
शिक्षक संघटनांनी काढलेल्या मोर्चात जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती गुरुनाथ पेडणेकर हे सामील झाले होते. पेडणेकर यांनी आपण तुमच्या सोबत असल्याचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना यावेळी सांगितले. (वार्ताहर)