शैक्षणिक धोरणाचा अधिकार शिक्षकांना हवा
By admin | Published: April 24, 2017 09:45 PM2017-04-24T21:45:57+5:302017-04-24T21:45:57+5:30
सावळाराम अणावकर : प्राथमिक शिक्षक समिती वैभववाडी शाखेचे त्रैवार्षिक अधिवेशन
वैभववाडी : शिक्षण क्षेत्राचे धोरण ठरविण्याचा अधिकार हा शिक्षकांनाच असला पाहिजे, असे मत राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे माजी अध्यक्ष सावळाराम अणावकर यांनी व्यक्त केले. प्राथमिक शिक्षक समितीच्या वैभववाडी शाखेचे त्रैवार्षिक अधिवेशन कोकीसरे येथील माधवराव पवार विद्यालयात झाले. यावेळी अणावकर बोलत होते. यावेळी समाजकल्याण सभापती शारदा कांबळे, सभापती लक्ष्मण रावराणे, उपसभापती हर्षदा हरयाण, जिल्हा परिषद सदस्य सुधीर नकाशे, पल्लवी झिमाळ, पंचायत समिती सदस्य अक्षता डाफळे, शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष नंदकुमार राणे, विस्तार अधिकारी शोभराज शेर्लेकर, तहसीलदारपदी निवड झालेल्या चैताली सावंत, शिक्षक नेते भालचंद्र चव्हाण, राज्य सल्लागार चंद्रकांत अणावकर, जिल्हा सरचिटणीस चंद्रसेन पाताडे, तालुकाध्यक्ष संतोष मोरे, शरद नारकर, सुरेखा कदम, नामदेव जांभवडेकर, किसन दुखंडे, सुनील चव्हाण, सुगंध तांबे, विनोद कदम, राजन जोशी, आदी उपस्थित होते. यावेळी अणावकर यांनी आरोग्य व शिक्षण क्षेत्र ‘कंत्राटी’ पद्धतीपासून अलिप्त ठेवायला हवे, असे सांगितले. लोकप्रतिनिधींनी शिक्षकांचे प्रश्न समजून घेतले पाहिजेत. शिक्षक काम करतो तेथील सामाजिक, आर्थिक स्थितीचे अवलोकन होणेही तितकेच गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.
अणावकर पुढे म्हणाले की, शिक्षकांवर शिक्षणापेक्षा अशैक्षणिक अतिरिक्त कामाचा बोजा अधिक आहे. शिक्षकांना एकीकडे आपण ‘शिल्पकार’ म्हणायचे आणि दुसरीकडे त्यांनाच उपेक्षित ठेवायचे हे योग्य नाही. शिक्षण क्षेत्रातील अडचणी लोकप्रतिनिधींनी समजून घेतल्या पाहिजेत, असे परखड मत त्यांनी व्यक्त केले. त्याचप्रमाणे शिक्षकांनी आपल्या न्याय मागण्यांसाठी संघटित होऊन लढले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
समाजकल्याण सभापती शारदा कांबळे म्हणाल्या, उत्पन्नाचा केवळ ३ ते ४ टक्के खर्च शासन शिक्षणावर करते. शिक्षक प्रतिकूल परिस्थितीत देशाचे भावी नागरिक बनविण्याचे काम करतात. त्यामुळे राष्ट्रहिताचा विचार करून सरकारने शिक्षणावरील गुंतवणुकीत वाढ करण्याची गरज आहे. यावेळी सभापती रावराणे, उपसभापती हरयाण, सुधीर नकाशे यांनी मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)
२२ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
यावेळी शिक्षक समितीच्यावतीने तालुक्यातील गरीब व अनाथ २२ मुलांना शैक्षणिक साहित्य व जीवनावश्यक साहित्याचे वाटप केले. तसेच नवोदय विद्यालय व अन्य परीक्षेतील ११ गुणवंत विद्यार्थ्यांना भेटवस्तू, प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. अधिवेशनाचे प्रास्ताविक सचिव लक्ष्मण ढवण यांनी केले, तर अध्यक्ष संतोष मोरे यांनी संघटनेच्या कामकाजाचा आढावा सांगितला. सूत्रसंचालन समीर सरवणकर व महादेव शेट्ये यांनी केले. अतिश कांबळे यांनी
आभार मानले.
शिक्षणावरील गुंतवणूक वाढली पाहिजे
आज शिक्षक सुखी आहे; पण शिक्षणाला शिक्षकाचे अस्तित्व नाही. अशी खंत अणावकर यांनी व्यक्त केली. शिक्षणावर होणारा खर्च हीच खरी देशाची गुंतवणूक आहे. ती गुंतवणूक वाढतेय की कमी होतेय हे पाहणे गरजेचे आहे. शिक्षणावरील खर्च वाढविला गेला नाही तर ते भविष्यात देशापुढील मोठे संकट असेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.