शिक्षकांनी संस्कारावर भर द्यावा
By admin | Published: February 5, 2015 08:32 PM2015-02-05T20:32:13+5:302015-02-06T00:39:10+5:30
संतोष जाधव : महात्मा गांधी मिशन स्कूलचे पारितोषिक वितरण
दोडामार्ग : शिक्षकांची मेहनत पाहता दोडामार्गमधील महात्मा गांधी मिशन स्कूलचे विद्यार्थी भविष्यात देशपातळीवर झळकतील. शिक्षकांनी गुणवत्ता व संस्कार यावर दिला जाणारा भर पाहता भविष्यात चांगले संस्कारक्षम विद्यार्थी घडतील, असा विश्वास दोडामार्गचे तहसीलदार संतोष जाधव यांनी व्यक्त केला.महात्मा गांधी मिशन स्कूलचे पारितोषिक वितरण सोमवारी पार पडले. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. विवेक नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाचा प्रारंभ तहसीलदार जाधव यांच्या हस्ते झाला. यावेळी दोडामार्गचे पोलीस निरीक्षक जयकुमार सूर्यवंशी त्यांच्यासमवेत उद्योजक गणपत देसाई, रत्नाकर परमेकर, प्रा. संदीप गवस, स्कूल कमिटी सेक्रेटरी आर. वाय. पाटील, सल्लागार सूर्यकांत परमेकर, सदस्य सूचन कोरगावकर, उदय पास्ते, सुहास देसाई, सतीश धर्णे व प्रशालेच्या मुख्याध्यापिका सुप्रिया परीट, आदी मान्यवर उपस्थित होते. तहसीलदार जाधव यांनी, नाईक यांनी दोडामार्गमध्ये दोन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या शाळेविषयी गौरवोद्गार काढले. यावेळी सूर्यवंशी यांनीही शुभेच्छा दिल्या.प्रास्ताविक मांडताना संस्थाध्यक्ष विवेक नाईक यांनी, आपली प्रशाला ही एक नावीन्यपूर्ण व काळाला सुसंगत शिक्षण देणारी अशी आहे. भले आमच्या प्रशालेत शिकणारे विद्यार्थी डॉक्टर, इंजिनिअर होतील न होतील; पण येथे शिक्षण घेणारा प्रत्येक विद्यार्थी माणूस म्हणून परिपूर्ण असेल, अशी ठाम ग्वाही उपस्थित पालकांना दिली. त्याचबरोबर आज आपला पाल्य शाळेत काय शिकतो, शाळा नेमके कोणते कार्य करते, याबाबत पालंकानी दक्ष असले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. मुलाला शाळेत घातले म्हणजे जबाबदारी संपली असे नाही. आपली मुले सक्षम आणि समर्थ बनविण्यात पालकांचा सहभाग तितकाच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. तर भविष्यात याहून अधिक उपक्रम व शैक्षणिक धडे देण्याचा आपला मनोदय त्यांनी बोलून दाखवला. यावेळी वर्षभरात विविध स्पर्धा व शालेय उपक्रमात कौशल्य गाजवलेल्या आणि सर्वोकृष्ट ठरलेल्या गुणवान विद्यार्थी चिमुकल्यांचा मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव झाला. या गुणगौरव कार्यक्रमातही आदर्श पालकांचा किताब देऊन नाईक यांनी प्रशालेतील गुणगौरव कार्यक्रमातील वेगळेपणा जपला. उपस्थितांचे स्वागत विवेक नाईक, दीपेश परब व नेहा नाईक हिने केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, आभार प्रशालेतील शिक्षक सुरेखा शेटकर, दीपाली देसाई, प्रतिमा गवस, निकिता नाईक, भावना श्रीवास्तव यांसह योगा शिक्षक दिगंबर राऊत व संगीत शिक्षक गंगाराम गोसावी यांनी केले. (प्रतिनिधी)
उर्मिला परब यांना
‘आदर्श पालक’ पुरस्कार
केवळ विद्यार्थ्याला शाळेत दाखल करून पालकाची जबाबदारी संपत नाही. विद्यार्थ्याची प्रगती शाळेत येऊन पालकांनी विचारली पाहिजे. शिवाय घरी अभ्यास घेतला पाहिजे व यातून आदर्श पालकाची भूमिका पार पाडली पाहिजे. पालकांना प्रोत्साहन देण्यासाठी संस्थेने यावर्षी पासून आदर्श पालक हा पुरस्कार देण्याचे ठरविले. यावर्षीचा हा पुरस्कार उर्मिला उल्हास परब यांनी पटकाविला. त्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.