तपासासाठी पथक गोव्याला
By admin | Published: September 22, 2016 12:40 AM2016-09-22T00:40:20+5:302016-09-22T00:40:20+5:30
संदीप मांजरेकर बेपत्ता प्रकरण: गूढ उकलण्याकडे तालुक्याचे लक्ष
कुडाळ : बेपत्ता संदीप मांजरेकरच्या प्रकरणी अधिक तपासासाठी कुडाळ पोलिसांचे एक पथक गोवा राज्यात गेले आहे. यामुळे संदीपला गोव्यात नेमके कुठे ठेवण्यात आले होते? व का? याकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.
कुडाळ-कुंभारवाडी येथील माजी ग्रामपंचायत सदस्य व शिवसेनेचे कार्यकर्ते संदीप मांजरेकर १६ सप्टेंबरपासून गूढरित्या बेपत्ता होते. त्यांचा तपास कुडाळ पोलिस गेले चार ते पाच दिवस करीत होते.
या दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संदीप व उदयच्या फोनवरील संभाषणानुसार या प्रकरणाचे धागेदोरे मिळाले. मंगळवारी दुपारी या प्रकरणी कुडाळ पोलिसांनी संदीपला त्याच्या कुडाळ-कुंभारवाडी येथील घरातून ताब्यात घेतले.
यावेळी मिळालेल्या माहितीनुसार संदीपच्या बेपत्ता कालावधीत संदीपचे अपहरण केल्याप्रकरणी पोलिसांनी संदीपचा चुलत भाऊ व शिवसेनेचा कार्यकर्ता उदय मांजरेकर (रा. कुंभारवाडी), सुनील पालांडे (रा. नाबरवाडी ), समीर सावंत ( रा. गोवा-चिपी) व संदीप कुंभार (रा. कुंभारवाडी) या चौघांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, संदीप कुंभार सोडून इतर तिघेही पोलिस कोठडीत आहेत.
गोवा येथे मेडिकल क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या समीर सावंत याच्या गोव्यातील थिवी येथील घरी संदीपला बेपत्ता कालावधीत गोवा येथे ठेवण्यात आले होते, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यानुसार पोलिसांनी अटक असलेल्या समीर सावंत याला घेऊन या प्रकरणी अधिक तपासासाठी बुधवारी सकाळी गोवा गाठले. संदीपला गोव्यात कुठे व किती दिवस ठेवले होते, याचा तपास कुडाळ पोलिसांचे पथक करणार आहे.
कुडाळचे पोलिस उपनिरीक्षक सचिन पवार यांच्या नेतृत्त्वाखाली हे पोलिसांचे गोवा येथे पथक गेले आहे.या प्रकरणात संशयित म्हणून अटक करण्यात आलेल्या उदय, सुनील व समीरची पोलिस कोठडी २२ रोजी पोलिस कोठडी संपत असून, या तिघांनाही गुरूवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या प्रकरणाचे राजकीय पडसाद उमटून वातावरण तापत असताना संदीपचा शोध लागला. (प्रतिनिधी)
चौथ्या संशयिताला अटक होणार
या प्रकरणी कुडाळ पोलिसांनी संशयित म्हणून चार जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये तिघांना अटक केली आहे. तर यातील अटक न झालेल्या संदीप कुंभारला लवकरच अटक करण्यात येणार आहे, अशी माहिती कुडाळ पोलिसांनी दिली.