सत्ताधाऱ्यांच्या कारभारामुळे सणासुदीत स्टॉल धारकांच्या डोळ्यात अश्रू, सतीश सावंत यांची टीका
By सुधीर राणे | Published: March 21, 2023 05:31 PM2023-03-21T17:31:48+5:302023-03-21T17:32:14+5:30
कणकवली : कणकवली येथील स्टॉलधारकांना विस्थापित करण्याचे काम सत्ताधारी आणि आमदार नितेश राणे यांनी केले आहे. वास्तविक गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला ...
कणकवली: कणकवली येथील स्टॉलधारकांना विस्थापित करण्याचे काम सत्ताधारी आणि आमदार नितेश राणे यांनी केले आहे. वास्तविक गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला स्टॉलधारकांच्या डोळ्यातून आनंदाश्रू येणे अपेक्षित होते. मात्र, या सत्ताधाऱ्यांच्या कारभारामुळे स्टॉल धारकांच्या डोळ्यात दुःखाश्रू आले आहेत अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख सतीश सावंत यांनी केली आहे.
कणकवली येथील मध्यवर्ती कार्यालयात आज, मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, नगरसेवक कन्हैया पारकर, प्रमोद मसुरकर, विलास गुडेकर, सचिन आचरेकर उपस्थित होते.
सतीश सावंत म्हणाले, चार वर्षापुर्वी बैठक घेत नितेश राणे यांनी कणकवली शहरातील स्टॉलधारकांना पर्यायी जागा देण्याचे आश्वासन दिले होते. यावेळी शहरातील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होत्या. मात्र, आता स्टॉल हटविण्यात आले. याबाबत आमदार नितेश राणे साधा ब्र पण काढत नाहीत. राणे यांनी ज्याप्रकारे इतर बाबतीत फसविण्याचे काम केले, तीच पद्धत येथेही केली. जर आता नगरपंचायत किंवा विधानसभेची निवडणूक असती तर ही स्टॉल हटाव मोहीम झालेच नसते. अशाचप्रकारे वैभववाडीमध्ये स्टॉलधारकांवर अन्याय करण्याचे काम करण्यात आले आहे.
ग्लोबल असोसिएटसने शहरातील भाजी मार्केटची इमारत तयार असल्याचे कळविले आहे. त्यामुळे नगरपंचायत प्रशासनाने याबाबतची भूमिका जनतेसमोर जाहिर करावी. याबाबत प्रशासन निर्णय घेण्यास विलंब का करत आहे.
पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी याविषयात लक्ष घालून या स्टॉलधारकांवरील अन्याय दूर करावा. तसेच त्यांना हक्काची जागा द्यावी. १९९७ मध्ये अशाचप्रकारे स्टॉल हटविण्याचा मुद्दा आला. त्यावेळी पालकमंत्री असलेल्या नारायण राणे यांनी तातडीने हटाव मोहिम थांबविली होती. आता ते केंद्रीय मंत्री आहेत. तसेच आमदार, जिल्हाध्यक्ष यांच्या पक्षाची सत्ता असतानाही त्यांच्याकडून जनतेला वेठीस धरले जात आहे.
शहरासह अन्य भागात सध्या सुरू असलेली इतर कामेही दर्जाहीन आहेत. कामे दर्जेदार होण्यास या मंडळींना इंटरेस्ट नसल्याचे सांगतानाच बीबीएम रद्द करून बीएम करण्याचा निर्णय हा हॉटमिक्सवाल्यांच्या फायद्यासाठी घेण्यात आला आहे. कामे दर्जेदार न झाल्यास कार्यकारी अभियंता यांना जाब विचारला जाईल.
आमदार राणे सांगत असतील की आम्ही २२०० कोटीचा निधी आणला, तर त्यांनी त्या कामाचा कार्यारंभ आदेश दाखवावा. कारण यापूर्वी सुरू केलेले वॉटर स्पोर्ट्स व अन्य प्रकल्पांचे काय झाले? याची माहिती जनतेला आहे. त्यामुळे जनता आता त्यांच्या खोट्या आश्वासनाला भुलणार नाही असेही सतीश सावंत म्हणाले.