तेगिनहाळ ग्रामपंचायतीची निवडणूक पहिल्यांदाच बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 06:34 PM2021-01-01T18:34:25+5:302021-01-01T19:01:59+5:30
gram panchayat Election Kolhapur- ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी राज्यात कुठे ४२ लाखांची तर कुठे सव्वा दोन कोटीची बोली जाहीरपणे झाली. परंतु, ग्रामपंचायतीच्या सदस्यत्वापासून वंचित राहिलेल्यांना संधी देण्याचा निर्णय गावकऱ्यांनी एकमताने घेतला. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या आर्थिक बोलीशिवाय कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील ह्यतेगिनहाळह्णची निवडणूक तरूणांच्या पुढाकारामुळे पहिल्यांदाच बिनविरोध झाली.
राम मगदूम
गडहिंग्लज : ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी राज्यात कुठे ४२ लाखांची तर कुठे सव्वा दोन कोटीची बोली जाहीरपणे झाली. परंतु, ग्रामपंचायतीच्या सदस्यत्वापासून वंचित राहिलेल्यांना संधी देण्याचा निर्णय गावकऱ्यांनी एकमताने घेतला. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या आर्थिक बोलीशिवाय कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील तेगिनहाळची निवडणूक तरूणांच्या पुढाकारामुळे पहिल्यांदाच बिनविरोध झाली.
तेगिनहाळ हे अवघ्या १२०० लोकवस्तीचे गाव. गावातील प्रमुख मंडळी विविध राजकीय पक्ष-गटात सक्रीय आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या आजवरच्या सर्वच निवडणुका बहुरंगी आणि मोठ्या चुरशीने झाल्या. परंतु, यावेळची निवडणूक कोणत्याही परिस्थितीत बिनविरोध करण्याचा निर्धार तरूणांनी केला, त्याला सर्वांनी साथ दिली.
आठवड्यापूर्वी गावातील प्रमुख मंडळी व निवडणुकीसाठी इच्छुकांची महालक्ष्मी मंदिरात बैठक झाली. त्यावेळी यापूर्वी ज्या कुटुंबांना ग्रामपंचायतीमध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे, त्यांना वगळून तरूण आणि सुशिक्षित नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा निर्णय एकमताने झाला. त्यामुळे १७ इच्छूकांपैकी १० जणांनी गावचा निर्णय मान्य करून उमेदवारी अर्जदेखील भरला नाही. ७ जागांसाठी ७ अर्ज दाखल करण्यात आले, ते सर्व अर्ज छानणीत वैध ठरल्यामुळे केवळ निकालाच्या घोषणेची औपचारिकताच बाकी आहे. नवनिर्वाचित सदस्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सल्लागार समिती नेमण्यात येणार आहे.
याकामी राहूल नौकूडकर, संदीप निलवे, सिद्धांत पाटील, ओंकार नौकुडकर, संजय पाटील, आदिनाथ नौकुडकर, प्रतीक नौकुडकर, हेमंत पाटील, ओंकार घाटगे, अक्षय नौकुडकर व शिवानंद पाटील आदी तरूणांनी महत्वाची भूमिका बजावली. त्यांना माजी सरपंच तुकाराम चौगुले, सदाशिव कळविकट्टे, चंद्रकांत पाटील, अनिल जाधव, रवींद्र नौकुडकर, रवींद्र कांबळे, परशराम पाटील, रामराव करासले, संभाजी पाटील, अंबाजी पाटील, वैजू पाटील, धोंडीबा चौगुले, आप्पाजी जाधव व कोतवाल दत्ता कांबळे आदी बुजूर्ग मंडळींचे मार्गदर्शन लाभले.
यांना मिळाली संधी
गावच्या सर्वांगीण विकासासाठी कांहीतरी नवीन करून दाखविण्याचा संकल्प सोडलेल्या विनोद नौकुडकर, मनोज जाधव, शेखर बाडकर, महानंद नौकुडकर, इंदूबाई कळविकट्टे, रेखा जाधव व रेखा चौगुले यांना बिनविरोध संधी देण्यात आली.
मुंबईकरांचेही मोलाचे योगदान..!
गावातील सर्व विधायक कामात बहुमोल योगदान देणाऱ्या मुंबईकर ग्रामस्थ मंडळाचाही ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध होण्यात मोलाचा वाटा आहे. राजकीय मतभेदाला मूठमाती मिळावी आणि सर्व गावकरी गुण्या-गोविंदाने नांदावेत, असा त्यांचा आग्रह होता. त्याला गावकऱ्यांनी मनापासून साथ दिली.