अलर्ट रहा!, आंबोली वर्षा पर्यटनाच्या पार्श्वभूमीवर तहसिलदारांचे लेखी आदेश
By अनंत खं.जाधव | Published: June 15, 2023 04:17 PM2023-06-15T16:17:14+5:302023-06-15T16:17:45+5:30
हजारो पर्यटक आंबोली घाटात धबधब्यांचा आनंद लुटण्यासाठी वर्षा पर्यटनाला येतात
सावंतवाडी : वर्षा पर्यटनाच्या पार्श्वभूमिवर आंबोली घाटात पावसाळ्यात होणारे अपघात टाळण्यासाठी योग्य ती अमंलबजावणी करून अलर्ट रहा, आवश्यक ठिकाणी रिफ्लेक्टर बसवा, रस्त्यात पडलेले खड्डे भरा अशा लेखी सुचना सावंतवाडीचे तहसिलदार श्रीधर पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला केल्या आहेत.
याबाबत आंबोली ग्रामपंचायत कार्यालयात बैठक झाली होती. यावेळी घाटात रिफ्लेक्टर नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढत आहे. तसेच अपघात घडल्यानंतर तात्काळ मदत उपलब्ध होत नाही, अशी नाराजी उपस्थितांकडुन व्यक्त करण्यात आली. याकडे सावंतवाडी पोलिस निरिक्षक फुलचंद मेंगडे यांनी तहसिलदार पाटील यांचे लक्ष वेधले होते. त्यानुसार त्यांनी तात्काळ याबाबतचे पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहे.
पावसाला सुरुवात होताच आंबोली वर्षा पर्यटनाला सुरुवात होते. हजारो पर्यटक हे आंबोली घाटात धबधब्यांचा आनंद लुटण्यासाठी येतात. यावेळी पर्यटकांची वाहने तसेच घाटात होणारी वाहतूक कोंडी यासर्व पार्श्वभूमीवर बांधकाम विभागाने विशेष लक्ष देण्याची गरज आहे. तसेच वर्षा पर्यटनाच्या दृष्टीने पोलिसांनीही वाहतूक नियोजन करणे गरजेचे असून पार्किंग बाबत विशेष दक्षता घेणे गरजेचे आहे.