भविष्यात भाजपमधून हकालपट्टी होणाऱ्या तेली यांनी राणें विषयी बोलू नये : सतीश सावंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2018 04:33 PM2018-12-05T16:33:43+5:302018-12-05T16:43:37+5:30
भाजप मधून भविष्यात हकालपट्टी होणाऱ्या राजन तेली यांनी नारायण राणें विषयी काही बोलू नये, असा टोला महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे प्रवक्ते तथा जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी लगावला आहे.
कणकवली : स्वतःचा स्वाभिमान गहाण टाकलेल्या राजन तेली यांना माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा हे सांगण्याचा अधिकार नाही. आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना व भाजपची युती झाल्यास तेली बंडखोरी करून आमदारकी लढवतील. त्यामुळे भाजप मधून भविष्यात हकालपट्टी होणाऱ्या राजन तेली यांनी नारायण राणें विषयी काही बोलू नये, असा टोला महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे प्रवक्ते तथा जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी लगावला आहे.
कणकवली येथील महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष संपर्क कार्यालयात बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आनंद ठाकुर उपस्थित होते.
सतीश सावंत पुढे म्हणाले, नारायण राणेंवर टिका करणाऱ्या राजन तेली यांनी आपले भाजप पक्षा मधील वय किती ते आधी सांगावे. सन 2014 मध्ये एका रात्रीत त्यांचा स्वाभिमान काय असतो ते जनतेने पाहिले आहे. त्यामुळे त्याना राणेंवर टिका करण्याचा नैतिक अधिकार नाही.
राज्यात तसेच देशात सध्या असलेल्या वस्तुस्थितिला धरूनच नारायण राणे बोलत आहेत. जनतेला होणारा त्रास ते आपल्या भाषणातून मांडत आहेत. त्यामुळे राणेना काही सांगायचेच असेल तर भाजप मधील वरिष्ठ काय ते सांगतील. त्याची काळजी तेली यानी करु नये.
आमदारकीवर डोळा ठेवून राजन तेली यांनी टिका करण्याचा एक कलमी कार्यक्रम राबवू नये. नारायण राणे यांनी 14 वर्षात काय केले ? असा प्रश्न राजन तेली विचारत आहेत. मात्र, या काळात त्यानी इतर काम काय केले यापेक्षा राजन तेली यानाच सर्वार्थाने प्रथम उभे करायचे काम केले एवढे मात्र निश्चित आहे. त्यामुळे केलेल्या उपकाराची जाण तेली यानी ठेवावी.
आकारीपड, वनसंज्ञा असे प्रश्न राणेनी मार्गी लावले नसतील तर त्याला सर्वस्वी कारणीभूत राजन तेली आहेत. कारण त्याकाळी पाठपुरावा करण्याचे काम तेली करीत असत. कार्यकर्त्याना राणेपर्यन्त पोहोचू न देणे, अडचणी आणून विकासकामे ठप्प करणे हे काम तेली करीत असत. नारायण राणेनी नेमके काय केले हे जनतेला माहीत आहे. त्यामुळे तुम्ही जनतेसाठी काय केले ते सांगा.
शिवसेना व भाजप युती झाली तर भविष्यात स्वतःचा विचार करून तेली आमदारकी लढवतील. तेली यांच्या जाण्यामुळे आमच्या पक्षाचे नुकसान काहीही झालेले नाही. याउलट फायदाच झाला. पण भाजप मधील अनेक पदाधिकारी त्यांच्यामुळे नाराज असून ते योग्य वेळी काय तो निर्णय घेतील. हे तेली यांनी लक्षात घ्यावे.असेही सतीश सावंत यावेळी म्हणाले.
राणे सहयोगी पक्षाचे खासदार !
नारायण राणे हे स्वाभिमान पक्षाचेच सदस्य असून ते भाजप सहयोगी पक्षाचे खासदार आहेत. याबाबत तेली यांना माहिती नसल्यास त्यांनी भाजपच्या वरिष्ठ सरचिटणीसांकडून ती करून घ्यावी. अलीकडेच महसुलमंत्री चंद्रकांत पाटील या मुद्यावर बोलले आहेत. त्यांच्याकडून माहिती घ्यावी. असेही सतीश सावंत यावेळी म्हणाले.