सांगा कसे जगायचे?, न रस्ता, न पाणी
By admin | Published: September 21, 2015 10:59 PM2015-09-21T22:59:47+5:302015-09-21T23:41:14+5:30
विनायक राऊत यांच्या गावची हाक : खासदारांनी तळगाव पेडवेवाडीत मुलभूत सुविधा पुरवाव्यात
मालवण : तालुक्यातील तळगाव पेडवेवाडी (फातरीचे टेंब) गावाला भारत स्वतंत्र काळातही रस्ता व पाण्याची सोय नाही. विशेष म्हणजे हे गाव खासदार विनायक राऊत यांचे असून पेडवेवाडीतील ग्रामस्थांना खासदारांनी पाणी, रस्ता व इतर सुविधांची पूर्तता करावी व शेकडो वर्षांची मागणीला न्याय द्यावा अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत. पर्यटनाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्हा जगाच्या नकाशावर पोहचला आहे. मात्र सुविधांची वानवा येथे नेहमीच दिसून आली आहे. २०० हून अधिक लोकवस्तीच्या वाडीवर रस्ताच पोहचला नाही. पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीरच आहे. जलस्वराजच्या नावाखाली लोकवर्गणीतून बांधलेली विहीर जमीन मालक खासगी ठरवून पाणी देत नाही. आजारी माणसाला दवाखान्यात नेण्यासाठी रिक्षा सोडाच दुचाकी जायला रस्ता नाही. शासनाला निवेदने, पत्रव्यवहार करूनही काहीच उपयोग झाला नाही.
शेतमळ्यातून पेडवेवाडीत यायला अर्धा ते पाऊन किमी पायपीट करावी लागते. पूर्वी रुंद असलेला हा मार्ग आता एका माणसालाही चालण्यासाठी जिकरीचा बनला आहे. गावातील वृद्ध, आजारी अथवा गरोदर स्त्रीला दवाखान्यात नेणेही मुश्किल आहे. गणेशोत्सवात गणेशाची मूर्ती आणतानाही अनेक विघ्ने आतापर्यंत आली आहेत. या मार्गावरून चालताना काही वषार्पूर्वी लक्ष्मण शिरोडकर हे वृद्ध पडले. त्यात त्यांना आपला अंगठाही गमवावा लागला. आज ते दोन पायावर उभेही राहू शकत नाही अशी स्थिती गणेशोत्सवाला येणारे चाकरमानी येतात मात्र या समस्यांमुळे तेही राहत नाहीत. त्यांची बायका-मुले येण्यास नकारच देतात. अशी व्यथा रामदास शिरोडकर व वाडीतील शेकडो ग्रामस्थांनी मांडली आहे. (प्रतिनिधी)
अनेक कुटुंबीयांनी केला गावालाच रामराम
पेडवेवाडी येथील काही कुटुंबे ग्रामपंचायत प्रशासनाच्या मनमानी कारभाराला कंटाळून गाव सोडण्याच्या मन:स्थितीत आहे. येथील कुटुंबे समस्यांचा डोंगर डोक्यावर घेऊन जगताना दिसत आहेत.
तर अनेक कुटुंबांनी वाडीत रस्ता, पाणी तसेच इतर सुविधा नसल्याने गाव सोडले देखील आहे.
गावाला शिवराम दळवींच्या रूपाने आमदार, दत्ता दळवींच्या रूपाने मुंबईचे महापौर लाभले. त्यांच्याकडे हजारो वेळा निवेदने दिली मात्र त्यांनीही केवळ आश्वासनेच दिली आहेत.
ग्रामपंचायतीचे आडमुठे धोरण सरपंच आणि ग्रामसेवकाचा मनमानी कारभार यामुळेच गावचा विकास झालेला नाही.
याबाबत खासदार विनायक राऊत यांनी लक्ष घालून गावला स्ता व पाण्याची सोय करून द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.