पंधरा वर्षात काय विकास केला तो जनतेला सांगा, राजन तेलींचे दीपक केसरकरांना खुले आव्हान
By अनंत खं.जाधव | Published: July 22, 2024 05:59 PM2024-07-22T17:59:12+5:302024-07-22T17:59:35+5:30
'हिम्मत असेल तर आमने-सामने या'
सावंतवाडी : जिल्ह्याचा विकास करण्यासाठी संपत्ती विकणार अशी भाषा करणाऱ्या मंत्री दीपक केसरकर यांनी हिम्मत असेल तर चर्चासत्राच्या माध्यमातून आमने सामने यावे आणि पंधरा वर्षात जिल्हयाचे किंबहूना मतदारसंघाचे काय भलं केलं हे लोकांसमोर मांडावे असे खुले आव्हान माजी आमदार राजन तेली यांनी दिले. शिक्षण खात्यामध्ये निर्विदा न काढताच तब्बल ८० कोटी रुपयांची कामे वाटण्यात आली असून पुजा खेडेकर प्रकरणातही मंत्री केसरकर यांचा संबध असल्याचे वृत्त खासगी वाहिन्यावर प्रसारित करण्यात आले आहे असा दावा ही तेली यांनी केला.
ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. तेली म्हणाले, निवडणुकीच्या तोंडावर नवनवीन घोषणा करायच्या हा जुनाच धंदा आहे. पंधरा वर्षांमध्ये केवळ येथील जनतेला फसवण्याचे काम केले आहे. पंचतारांकितच्या घोषणा केसरकर करत आहेत, परंतु स्वतःच्या घरासमोरील एसटी बस स्थानक साडेसात वर्ष होऊनही ते सुधारू शकले नाहीत ही शोकांतिका आहे. रेडी येथे सी वर्ल्ड प्रकल्पाबाबत ते बोलत आहेत तसेच पंचतारांकित ताज हॉटेलही दोन महिन्यात सुरु होणार असल्याचे ते म्हणत आहेत. या ठिकाणी उद्योग व्यवसाय यायलाच पाहिजे त्याबाबत आमचा विरोध नाही. परंतु उद्योग येताना स्थानिकांना तिकडून विस्थापित करू नये ही आमची भूमिका आहे. त्यामुळे उद्या तुम्ही कुठल्याही नेत्यांना बोलवा परंतु त्या नेत्यांनी आधी जनतेचे प्रश्न ऐकून घ्यावे लागतील अशी माझी विनंती आहे.
पक्ष तिकीट देईल की नाही ही दूरची गोष्ट, परंतु..
रेडी येथे कुठल्याही प्रकारची जमीन नसताना शेवटची घोषणा ते करत आहे.निवडणूक डोळ्यासमोर ठेवून त्यांचे हे प्रयत्न सुरू आहेत त्यामुळे गोड बोलून इथल्या जनतेची आणि तरुण पिढीची फसवणूक करण्याची संधी मी केसरकर यांना देणार नाही पक्ष मला तिकीट देईल की नाही ही दूरची गोष्ट आहे. परंतु येणाऱ्या निवडणुकीमध्ये गावागावात जाऊन केसरकर यांच्या आश्वासनांचा त्यांनी केलेल्या घोषणांचा बुरखा मी फाडणार आहे.
हिम्मत असेल तर आमने-सामने या
मंत्री केसरकर प्रॉपर्टी विकण्याची भाषा पुन्हा एकदा करू लागले आहेत. परंतु गेल्या पंधरा वर्षात आमदारकी मंत्रीपद बघून ज्यांना काही करता आले नाही ते आता पुन्हा एकदा जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी सज्जनतेची भाषा करत आहेत. परंतु विकास बाजूला ठेवा सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक तरी असा विकास सांगा की जो तुम्ही केलात आणि त्यातून तुम्ही इथल्या पाच-दहा तरुणांना रोजगार देऊ शकला. त्यामुळे हिम्मत असेल तर चर्चासत्राच्या माध्यमातून आमने सामने या असे आव्हानही तेली यांनी दिले.