खारेपाटणमध्ये गोवा बनावटीची दारू बेकायदेशीर वाहतूक करणारा टेम्पो पकडला, एकूण ६३ लाखांचा मुद्देमाल जप्त
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: March 18, 2024 01:51 PM2024-03-18T13:51:44+5:302024-03-18T14:01:27+5:30
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सर्वात मोठी कारवाई
संतोष पाटणकर
खारेपाटण : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सद्या देशात सर्वत्र आचारसंहिता जाहीर झालेली असतानाच मुंबई - गोवा राष्ट्रीय महार्गावर खारेपाटण चेक पोस्ट येथे मधून गोवा बनावटीची बेकायदेशीर दारू वाहतूक करणारा टेम्पो पोलिसांनी पकडला. यामध्ये सुमारे २८ लाख ८८ हजार ४०० रुपये किमतीचे मद्य व ३५ लाख रुपये किमतीची वाहन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आज सोमवारी पहाटे ६.३० वाजता राज्य उत्पादन शुल्क व एस एस टी पथकाने व खारेपाटण पोलीस यांच्यावतीने संयुक्त कारवाई करण्यात आली.
याबाबत माहिती अशी की, टेम्पो चालक दिनेश रमेश व्यास (वय-३९, रा. विरार) हा आपल्या मालकीचा टेम्पो क्रमांक (एम एच -४८ बी एम ९६९१) घेवून गोव्याहून मुंबईच्या दिशेने चालला होता. खारेपाटण चेकपोस्ट येथील तपासणी नाक्यावरील पोलीस कर्मचारी उद्धव साबळे यांनी वाहन चालकांचा संशय आल्याने गाडी तपासासाठी थांबविली असता वाहनात बेकायदेशीर गोवा बनावटीची दारू आढळून आली.
याबाबत तात्काळ राज्य उत्पादन शुल्क विभाग सिंधुदुर्ग व कणकवली पोलीस यांना माहिती देण्यात आली. यावेळी कणकवली पोलीस उपनिरीक्षक शरद देठे व राज्य उत्पादन शुल्क कणकवली निरीक्षक एन एल शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेत कारवाई केली. यावेळी एस एस टी खारेपाटण पथक प्रमुख आर एल शिंदे, कनिष्ठ अभियंता बापू कुंडलिक कुचेकर, एस वी दळवी, वैभव नामदेव घाडगे, खारेपाटण पोलीस नाईक उद्धव साबळे, एस एन कुवेसकर यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
वाहन चालक दिनेश व्यास याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास खारेपाटण पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभाग सिंधुदुर्ग करीत आहे. तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे बोलले जाते.