मडुऱ्यात टेम्पोला अपघात; सुदैवाने चालक बचावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2020 05:23 PM2020-09-19T17:23:46+5:302020-09-19T17:25:10+5:30
बांदा-शिरोडा मार्गावरील मडुरा डिगवाडी नाबर स्कूलजवळ दुपारच्या सुमारास समोरून अचानक आलेल्या वाहनाला बाजू देताना टेम्पोला अपघात झाला. साईडपट्टीच्या धोकादायक कामामुळे अपघात झाल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. चालकाला किरकोळ दुखापत झाली असून वेळीच गाडीवर नियंत्रण मिळविल्याने हानी टळली.
बांदा : बांदा-शिरोडा मार्गावरील मडुरा डिगवाडी नाबर स्कूलजवळ दुपारच्या सुमारास समोरून अचानक आलेल्या वाहनाला बाजू देताना टेम्पोला अपघात झाला. साईडपट्टीच्या धोकादायक कामामुळे अपघात झाल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. चालकाला किरकोळ दुखापत झाली असून वेळीच गाडीवर नियंत्रण मिळविल्याने हानी टळली.
शिरोड्याहून बांद्याच्या दिशेने जाणारा मालवाहू छोटा टेम्पो मडुरा हनुमान मंदिराजवळील मोरीपुलाजवळ आला असता रस्त्याच्या दुतर्फा वाढलेल्या झाडीमुळे समोरून येणारे वाहन चालकाच्या अचानक दृष्टीस पडले. एका बाजूने साईडपट्टी धोकादायक असल्याने जीव वाचविण्यासाठी टेम्पो चालकाला गाडी झुडपांनी व्यापलेल्या गटारात न्यावी लागली.
टेम्पोच्या पुढे केवळ दहा फुटांच्या अंतरावर मोरीपुल राहिले. चालकाने वेळीच नियंत्रण मिळविल्याने चालक बालंबाल बचावला. अन्यथा टेम्पोसहीत चालक मोरीपुलात कोसळला असता. या घडलेल्या घटनेला सार्वजनिक बांधकाम विभाग सर्वस्वी जबाबदार असल्याचे संतप्त ग्रामस्थांनी सांगितले. दुपारी उशीरा ग्रामस्थांच्या सहकार्याने टेम्पो झुडपांतून बाहेर काढण्यात आला. तसेच शेर्ले ते कोंडुरा पर्यंत रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झुडपे हटविण्याची मागणीही ग्रामस्थांनी केली आहे.
बांधकामला जाग कधी येणार ? : वालावलकर
पावसाळ्यात वाहनांना बाजू देण्यासाठी साईडपट्टी धोकादायक बनते, याची कल्पना बांधकाम विभागाला वारंवार देण्यात आली आहे. हनुमान मंदिराजवळील मोरीपुलाचे संरक्षक कठडे जीर्ण झाले असून झुडपांनी व्यापले आहेत. लहान अपघात झाला असून याची दखल सार्वजनिक बांधकाम विभाग घेणार काय? तसेच अजून किती अपघात झाल्यावर अधिकाऱ्यांना जाग येणार असा सवाल मडुरा उपसरपंच विजय वालावलकर यांनी केला आहे.