बंदर जेटीवर व्यवसाय करण्यास ‘तात्पुरती’ परवानगी
By Admin | Published: September 19, 2016 11:25 PM2016-09-19T23:25:08+5:302016-09-20T00:06:43+5:30
भाजपने घेतली बंदर निरीक्षकांची भेट : स्टॉलधारकांसाठी लवकरच पार्किंग जागेत दुकानगाळे
मालवण : येथील बंदर जेटी येथे बंदर विभागाच्या जागेत गेली काही वर्षे स्थानिकांकडून पर्यटन व्यवसाय होत आहे. स्थानिकांनी स्वत:च्या हिमतीवर व्यवसाय सुरू केले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर बंदर विभागाकडून अन्याय न होऊ देता कायमस्वरूपी दुकान गाळ्यांची व्यवस्था करण्यात यावी. बंदर विभागाने स्थानिक व्यावसायिकांशी समन्वय साधून त्यांना दुकान गाळ्यांची उभारणी होईपर्यंत तात्पुरत्या स्वरुपात बंदर जेटी येथील शेडमध्ये व्यवसाय करण्याची व्यवस्था आणि परवागनी द्यावी, अशी मागणी भाजपा तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर यांनी बंदर निरीक्षक रजनीकांत पाटील यांच्याकडे केली.
स्टॉलधारकांसमवेत भाजपच्या शिष्टमंडळाने भेट घेत व्यावसायिकांवर अन्याय न होता तात्पुरती जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केल्यानंतर बंदर निरीक्षक पाटील यांनी बंदर विभागाच्या पार्किंग जागेत स्टॉलधारकांसाठी दुकानगाळे उपलब्ध करून दिले जाणार आहेत. याबाबतचा प्रस्तावही लवकरच वरिष्ठांकडे पाठविण्यात येईल, असे स्पष्ट केले. तर व्यावसायिकांना व्यवसायाच्यादृष्टीने कायमस्वरूपी दुकानगाळे उभारण्यात येईपर्यंत बंदर जेटी येथील शेडमध्ये दुकाने थाटण्यास पाटील यांनी समर्थता दर्शविली आहे. मालवण भाजपच्या शिष्टमंडळाने बंदर निरीक्षक यांची सोमवारी भेट घेतली. यावेळी तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर, शहर अध्यक्ष बबलू राऊत, बचतगट संयोजक पूजा सरकारे, हेमंत मोंडकर, दादा आचरेकर यांच्यासमवेत स्टॉलधारक व्यावसायिक उपस्थित होते. बंदर राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनीही मालवण दौऱ्यावर असताना जेटी तसेच पार्किंगची पाहणी केली आहे. बंदर विभागाकडून तशा पद्धतीचा प्रशासकीय प्रस्ताव पाठविला गेल्यास मंत्रीमहोदय तत्काळ निधी उपलब्ध करून देतील, असे बाबा मोंडकर यांनी
सांगितले. (प्रतिनिधी)
स्थानिकांवर अन्याय होऊ नये
स्थानिक व्यावसायिक स्व कष्टाने पर्यटन क्षेत्रात उतरले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर अन्याय न करता परप्रांतीय व्यवसायिकांना अभय देण्यात येऊ नये. स्थानिक स्टॉलधारकांना कायमस्वरूपी गाळे उपलब्ध करून देण्यासाठी बंदर विभागाकडून नियोजन करून याचा प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर पाठविण्यात यावा. याबाबत बंदर विकास राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे भाजपकरून पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे मोंडकर म्हणाले. यावेळी स्टॉलधारकानींही समस्या मांडल्या. यावर बंदर निरीक्षकांनी जेटी येथील शेडमध्ये तात्पुरत्या स्वरुपात व्यवसाय करण्यासाठी समर्थता दर्शविली आहे.
पार्किंग ‘इन-आऊट’ असावे
पर्यटकांच्या गाड्या पार्किंगसाठी बंदर विभागाच्या माध्यमातून प्रशस्त पार्किंग व्यवस्था तयार करण्यात आली आहे. भविष्यात या पार्किंग जागेत एका बाजूने दुकानगाळे उभारले जाणार असल्याने व्यावसायिकांची विक्री व्हावी तसेच पर्यटकांना गाड्या पार्क करताना सुसूत्रता यावी यासाठी जुनी स्टेट बँक व हॉटेल सागर किनारा या दोन ठिकाणाहून इन-आऊट वाहतूक व्यवस्थेबाबत विचार व्हावा. जेणेकडून व्यवसायिकांना त्याचा फायदा होऊ शकेल, असेही मोंडकर यांनी सांगितले. किल्ले सिंधुदुर्ग दर्शनासाठी जाणाऱ्या पर्यटकांची आम्ही शिवप्रेमी म्हणून सेवा देतो. बंदर विभागाची जागा असली तरी याचे रक्षण आम्ही करत आलो आहोत. त्यामुळे स्थानिकाना बंदर विभागाकडून सहकार्य मिळावे, असे दादा आचरेकर यांनी सांगितले.