दोन आरोपींना १० वर्षांची सक्तमजुरी

By admin | Published: January 24, 2017 12:02 AM2017-01-24T00:02:55+5:302017-01-24T00:02:55+5:30

जिल्हा सत्र न्यायालयाचा निर्णय : एकतर्फी प्रेमातून विद्यार्थिनीवर हल्ला प्रकरण

Ten years of rigorous imprisonment for two accused | दोन आरोपींना १० वर्षांची सक्तमजुरी

दोन आरोपींना १० वर्षांची सक्तमजुरी

Next

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील आंबव महाविद्यालयात शिकत असणाऱ्या विद्यार्थिनीवर खुनी हल्ला केलेल्या प्रकरणातील दोन्ही आरोपींना दहा वर्षे सश्रम कारावास व प्रत्येकी दहा हजार रुपयांचा दंड, अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. सोमवारी जिल्हा सत्र न्यायालयाने हा निकाल दिला.
या हल्ल्यातील विद्यार्थिनी संगमेश्वर तालुक्यातील आंबव राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयात माहिती व तंत्रज्ञान विषयाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत होती. ६ आॅगस्ट २०१४ ला दुपारी २ वा.च्या सुमारास सदर विद्यार्थिनी महाविद्यालयाबाहेरील खानावळीत जेवण करून महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारापाशी आली. त्यावेळी दुचाकीवरून रोहित रामचंद्र भोईटे (वय २६, रा. होमगाव, ता. जावळी, जि. सातारा) याने धारधार हत्याराच्या सहायाने तिच्या पोटावर वार करून आपला साथीदार शेखर बाबासाहेब शिंदे (२८, रा. इंदवली, ता. जावळी, जि. सातारा) याच्यासोबत दुचाकीवरून रत्नागिरी मार्गाकडे पळून गेला. या हल्ल्यात सदर विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली होती. तिच्या मैत्रिणी व महाविद्यालय व्यवस्थापनाने या प्रकाराची गंभीर दखल घेत तिला उपचारासाठी तत्काळ रत्नागिरीमध्ये हलविले.
आरोपींना पकडण्यासाठी देवरुख पोलिसांनी पाठलाग सुरू करून वायरलेसद्वारे अन्य पोलिस ठाण्यांना या प्रकरणाची माहिती दिली होती. संगमेश्वर पोलिस ठाण्याचे वाहतूक पोलिस भूषण सावंत यांनी धाडसाने आरवली येथे सापळा रचून आरोपींच्या मुसक्या आवळल्या. दोन्ही आरोपींसह त्यांच्या ताब्यातील दुचाकी व हल्ल्यात वापरण्यात आलेले हत्यार हस्तगत केले.
रोहित भोईटे व शेखर शिंदे या दोघांवर देवरुख पोलिस ठाण्यात भा. दं. वि. कलम ३०७, ३५४, (ड)(१), ३४ तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००८ चे कलम ६६(१)(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
यानुसार रोहित व शेखरला अटक करण्यात आली होती. मात्र, यातील रोहितला ६ आॅगस्ट २०१४ पासून आजतागायत जामीन मिळू शकला नव्हता. गेली अडीच वर्षे रत्नागिरी जिल्हा सत्र न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश व्ही. एम. दीक्षित यांनी सोमवारी या खटल्याचा निकाल जाहीर केला आणि दोन्ही आरोपींना दहा वर्षे सश्रम कारावास आणि प्रत्येकी दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली. दहा हजार रुपये न भरल्यास सहा महिन्यांच्या साधा कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. याप्रकरणी सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. विनय गांधी यांनी काम पाहिले. या हल्ल्याचा तपास देवरुख पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक डॅनियल बेन, त्यांचे रायटर उदय चांदणे, सहायक पोलिस उपनिरीक्षक एस. एम. नागले, हेडकॉन्स्टेबल अनंत जाधव, राजेंद्र जाधव, प्रमोद वाघाटे, तसेच सुनील आयरे यांनी काम पाहिले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Ten years of rigorous imprisonment for two accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.