हळबे महाविद्यालयात निधी वसुलीवरून तणाव
By admin | Published: July 2, 2016 11:32 PM2016-07-02T23:32:47+5:302016-07-02T23:32:47+5:30
प्राचार्य नरमले : अपमानास्पद वागणूक
दोडामार्ग : दोडामार्ग येथील लक्ष्मीबाई हळबे महाविद्यालयात युवती स्वयंनिर्भर योजना उपक्रमाअंतर्गत जमा करण्यात येणाऱ्या निधीबाबत प्राचार्यांनी विकासपूरक कामाचे नाव दिले होते. याचा हेल्पलाईन ग्रुपने जाब विचारताच प्राचार्यांनी कार्यकर्त्यांना अपमानास्पद वागणूक दिल्याने महाविद्यालय परिसरात वातावरण तणावपूर्ण बनले. यावेळी कार्यकर्त्यांनी आक्रमक होत विद्यार्थ्यांकडून पैसे वसूल करून गोरगरीब विद्यार्थ्यांची मुस्कटदाबी सहन करणार नाही. तसेच हा भ्रष्टाचार असून तो थांबविण्यात आला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देताच प्राचार्य नरमले. त्यांनी समझोत्याची भूमिका घेतल्याने तणाव निवळून अनर्थ टळला.
पंधरा दिवसांपूर्वी येथील दोडामार्ग हेल्प लाईन ग्रुपच्या पदाधिकारी वैभव इनामदार, चेतन चव्हाण, संजय सातार्डेकर, भरत जाधव, शैलेश गावडे, भूषण सावंत, बाळा गवस, आदींनी महाविद्यालयात जाऊन चारशे रूपये वसुलीचा जाब विचारला. मात्र, यावेळी प्राचार्य डॉ. व्ही. ए. पाटील उपस्थित नसल्याने प्रभारी प्राचार्य बर्वे यांच्याशी संपर्क साधून अशा प्रकारची लुटमार थांबवा, विद्यार्थ्यांना पैशासाठी विनाकारण त्रास देऊ नका, असे सांगत जमा-खर्चाचा हिशेब देऊन विद्यार्थ्यांना पैसे परत करा, अशी मागणी केली होती. यानंतर प्राचार्य पाटील महाविद्यालयात हजर झाल्यानंतर पुन्हा एकदा हेल्पलाईनच्या पदाधिकाऱ्यांनी जाब विचारला होता.
यावेळी स्थानिक सल्लागार समिती सदस्य बाबुराव धुरी, भाई परमेकर व प्राचार्य यांनी लेखी पत्र देत येत्या पंधरा दिवसात संगणक कक्ष व व्यायाम शाळा सुस्थितीत करू, असे आश्वासन दिले होते. पण याची कार्यवाही पंधरा दिवसानंतर झाली नसल्याने शनिवारी पुन्हा वरील पार्श्वभूमीवर आज हेल्पलाईनच्या पदाधिकाऱ्यांनी प्राचार्यांना विचारणा करण्यासाठी गेले असता प्राचार्य डॉ. व्ही. ए. पाटील यांनी उडवाउडवीची उत्तरे देत तुम्हाला हिशोब देणार नाही. शिवाय असा कोणताही प्रकार नसून चुकीची माहिती आपण वृत्तपत्रांना दिली, असा आरोप करीत, केबिनमधून ‘गेट आऊट’ असे फर्मान सोडले. पोलिसांना पाचारण करून तुमच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा दम भरला.
यावर भ्रष्ट कारभार करण्यासाठी मुलांचा वापर होऊ नये. तसे झाल्यास तुमच्यासह संस्थेला गंभीर परिणाम भोगावे लागतील, असे सांगितल्यानंतर प्राचार्यांनी नरमाईची भूमिका घेत तुम्हाला मंगळवारपर्यंत हिशोब देण्यात येईल, असे सांगितले.
दरम्यान, प्राचार्यांनी वृत्तापत्रातून चुकीच्या बातम्या प्रसिद्ध केल्यानेही संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यामुळे यावेळी उपस्थित कार्यकर्ते व विद्यार्थीही आक्रमक झाल्याने परिसरात तणाव निर्माण झाला. तर या प्रकारानंतर दोडामार्ग पत्रकार समितीने तातडीची बैठक घेऊन डॉ. पाटील यांच्या वक्तव्याचा निषेध
केला. (प्रतिनिधी)