परप्रांतीयांमुळे स्थानिकांची उपासमार!
By admin | Published: September 11, 2015 10:06 PM2015-09-11T22:06:36+5:302015-09-11T22:06:36+5:30
तुषार पाळेकर : परप्रांतीय नौकांचे मत्स्यसाठ्यावर आक्रमण; ‘ती’ जाळी शासनास परत करा
देवगड : शासन युएनडीपीमार्फत मच्छिमारांना शाश्वत मच्छिमारी आणि संवर्धन याबाबतचे धडे देत असताना त्याची अंमलबजावणी स्थानिक मच्छिमार करतात; परंतु यामधून निर्माण होणारा मत्स्यसाठा मात्र, परप्रांतीय नौका अतिक्रमण करून लुटून नेतात. त्यामुळे जिल्ह्यातील स्थानिक मच्छिमार हैराण झाले आहेत. त्याच्यावर मत्स्योत्पादन घटल्याने उपासमारीची वेळ आली आहे. युएनडीपीमार्फत मच्छिमारांना १९ आॅगस्ट रोजी देण्यात आलेली जाळी शासनास परत करावी, अशा मन:स्थितीत मच्छिमार आहेत. ज्यांना ही जाळी मिळाली आहे त्यांनी ती शासनास परत करावी, असे आवाहन देवगड तालुका युवा मच्छिमार नेते तुषार पाळेकर यांनी केले आहे.पाळेकर यांनी प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे की, युएनडीपीमार्फत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मच्छिमारांना शाश्वत मासेमारी व मत्स्यसंवर्धन याबाबत माहिती प्रात्यक्षिकाद्वारे दिली जाते. या माहितीद्वारे जिल्ह्यातील मच्छिमार शाश्वत मच्छिमारी करतात. जेणेकरून मत्स्यसाठा मोठ्या प्रमाणात वाढेल व मत्स्यनिर्मिती मोठ्या प्रमाणात होऊन येथील स्थानिक मच्छिमार आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकतो. परंतु, गेली ७ ते ८ वर्षे या जिल्ह्यात परप्रांतीय मच्छिमार महाराष्ट्राच्या ७२0 किलोमीटर सागरी हद्दीत १२ नॉटीकल मैल आत येऊन बेकायदेशीर मासेमारी करीत असल्याने येथील मत्स्यसाठा संपुष्टात येत आहे. त्याबरोबर मत्स्योत्पादन घटत असल्याने मत्स्यसाठा निर्मिती न
होता स्थानिक मच्छिमारांवर उपासमारीची वेळ आली आहे. (प्रतिनिधी)
परप्रांतीयांचा धुमाकूळ सुरूच
सागरी हद्दीत अतिक्रमण करणाऱ्या या परप्रांतीय नौका
हायस्पीड ४00 ते ५00 हॉर्सपॉवर असून, छोट्या पारपंरिक मच्छिमारांचे मोठ्या प्रमाणात जाळ््यांचे नुकसान करीत आहेत. यासंदर्भात प्रत्यक्षात जाब विचारला असता त्या परप्रांतीय नौकांवरील खलाशी वर्गाकडून छोट्या मच्छिमारांवर वारंवार हल्ले होऊन मारहाण झाल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. या नौकांबाबत संबंधित विभागाकडे तक्रार करूनही त्यांचा धुमाकूळ हा किनारपट्टीवर सुरूच आहे.
जिल्ह्यातील मच्छिमार सक्षम
परप्रांतीय नौकांची तपासणी केली असता नौका परवान्यातील नमूद इंजिन प्रकार, इंजिन क्षमता व प्रत्यक्ष नौकेवरील इंजिन, आदी क्षमता यातही तफावत आढळून येत आहे. या नौकांचा त्रास असाच सुरू राहिल्यास सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व मच्छिमार परप्रांतीयांचे आक्रमण परतविण्यास सक्षम आहेत, असेही तुषार पाळेकर यांनी प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.