सिंधुदुर्गातील खारेपाटणमध्ये भीषण अपघात; पुलावरून कंटेनर थेट नदीत कोसळला, दोघांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2022 08:05 AM2022-03-23T08:05:53+5:302022-03-23T08:08:03+5:30
Accident in Kharepatan : कणकवली तालुक्यातील खारेपाटण मुख्य पुलावर मंगळवारी रात्री ११.३० वाजण्याच्या दरम्यान एक कंटेनर अचानक खारेपाटण पुलावरून थेट शुक नदीत कोसळल्याने मोठा अपघात झाला.
- संतोष पाटणकर
खारेपाटण (सिंधुदुर्ग) - मुंबई - गोवा महामार्गावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील खारेपाटण मुख्य पुलावर मंगळवारी रात्री ११.३० वाजण्याच्या दरम्यान गोव्यावरून मुंबईच्या दिशेने जाणारा महेश ट्रान्सलाइन प्रायव्हेट लिमिटेड कम्पनीचा एक कंटेनर( भारत ब्रेंज कँपणीचे अवजड वाहन) क्रमांक एम. एच. ४७ ए. एस. २२६० भरधाव वेगाने जात होता. तो अचानक खारेपाटण पुलावरून थेट शुक नदीत कोसळल्याने मोठा अपघात झाला.यामध्ये वाहन चालक व क्लिनर या दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे.
या अपघातात वाहन चालक किशन सुभाष ( वय ३३, राहणार उत्तरप्रदेश ) व सोबत क्लीनर (ओळख पटलेली नाही) अशा दोघांचा जागीच मृत्यू झाला. या कंटेनर मध्ये सीपला कंपनीची औषधे होती .ती घेऊन मुंबईच्या दिशेने तो चालला होता. अपघात एवढा भीषण होता की खारेपाटण पुलावरून सुमारे ८० फूट खोल नदीत पाण्यात तो कोसळला. परंतु नदीत पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने मदत कार्यात अडथळा येत होता. गावकऱ्यांच्या मदतीने खारेपाटण दुरक्षेत्राचे पोलीस नाईक उद्धव साबळे,होमगार्ड अमोल परब,भालचंद्र तीवरेकर ,वन विभागाचे विश्वनाथ माळी, खारेपाटण ग्रामस्थ नितीन चव्हाण,सामाजिक कार्यकर्ते संकेत शेट्ये,संदेश धुमाळे आदींनी तातडीने सहकार्य केले. रात्रीचा काळोख असल्याने मदत करताना अडचण येत होती. मृतदेह खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्र येथे पुढील तपसासाठी नेण्यात आले. या अपघाताचा अधीक तपास खारेपाटण दुरक्षेत्राचे पोलीस अधिकारी करत आहेत.