अधिकाऱ्यांची शेतकऱ्यांकडे पाठ
By admin | Published: June 10, 2015 10:53 PM2015-06-10T22:53:15+5:302015-06-11T00:44:53+5:30
शेतकरी संतप्त : वादळी पावसाच्या नुकसानीचा पंचायत समितीने केला पंचनामा
मडुरा : इन्सुली बिलेवाडी येथे झालेल्या वादळामध्ये शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाल्याने कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांकडे पाठ फिरवली होती. तीन-चार दिवस उलटूनही पंचनामा करण्यात आला नव्हता, अशी संतप्त प्रतिक्रिया बिलेवाडी येथे पाहणीसाठी आलेले सावंतवाडी पंचायत समिती सभापती प्रमोद सावंत आणि जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती गुरुनाथ पेडणेकर यांच्यासमोर शेतकऱ्यांनी मांडली.
इन्सुली बिलेवाडी येथील शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने आपल्या शेतजमिनीत कर्ज काढून केळीच्या बागा फुलविल्या होत्या. गणपती सणाच्या हंगामात पिक हाती लागेल अशा योजनेच्या शेतकऱ्यांनी केळीच्या बागा फुलविल्या होत्या, परंतु अचानक आलेल्या वादळामध्ये लाखोचे नुकसान झाले असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
पंचनामा करुनही हाती काही लागणार नसले तरी आपुलकीने येथील फळबागायत आणि शेतकऱ्यांची साधी विचारपूस देखील कृषी अधिकाऱ्यांमार्फत करण्यात आली नव्हती. प्रमोद सावंत यांनी कृषी अधिकाऱ्यांना याचा जाब विचारताच प्रत्येक कृषी अधिकारी आपआपली कैफियतच मांडत असल्याचे दिसून आले.
यावेळी प्रमोद सावंत आणि गुरुनाथ पेडणेकर यांच्यासह गट विकास अधिकारी शरद महाजन, मंडळ कृषी अधिकारी ए. पी. एकल, तालुका कृषी अधिकारी बी. वाय. वांवळे, इन्सुली कृषी सहाय्यक अधिकारी पी. पी. सावंत आणि नुकसानग्रस्त शेतकरी उपस्थित होते.
२५ लाख नुकसान
इन्सुली कृषी सहाय्यक अधिकारी पी.पी. सावंत यांनी उशिराने पंचनामा दाखल केल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमध्ये अमित सावंत, भगवान कोठावळे, अनिल आईर, विश्राम गावडे, रामचंद्र तारी, गुरुनाथ गावडे, आप्पा कोठावळे, जेरॉन फर्नाडीस, संतोष सावंत, संतोष मांजरेकर, महादेव सावंत, बापू, कोठावळे, गुरुनाथ गावडे, प्रदीप सावंत, अभय आजगावकर, सखाराम राणे यांची नावे समाविष्ट असून एकूण २४ लाख ६१ हजार २१३ रुपयांचे नुकसान झाले असल्याचा पंचनामा इन्सुली सावंत यांनी सादर केला आहे.