मंत्री केसरकरांविरोधातील ठाकरे गटाचे 'एप्रिल फुल आंदोलन' योग्यच - राजन तेली
By अनंत खं.जाधव | Published: April 4, 2023 06:29 PM2023-04-04T18:29:08+5:302023-04-04T18:30:04+5:30
आश्वासने देवून लोकांची फसवूणक होत असेल तर आंदोलने होणारच
सावंतवाडी : लोकशाहीत प्रत्येकाला आंदोलन करायचा अधिकार आहे. समोरचा चुकत असेल तर त्याची चूक दाखवून दिली गेली पाहिजे गप्प बसून चालणार नाही. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाने केलेले आंदोलन योग्यच आहे असे म्हणत भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाने केलेल्या एप्रिल फुल आंदोलनाचे समर्थन केले.
त्याचवेळी त्यांनी सावंतवाडीला गतवैभव प्राप्त होण्यासाठी सर्वानी एकत्र आले पाहिजे असे आवाहन ही केले आहे. भाजप सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात महाविकास अभियानाची सुरूवात करत असून जिल्हा परिषद मतदार संघनिहाय बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत त्यांची माहिती तेली यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी जिल्हा बँक संचालक रविंद्र मडगावकर, माजी नगराध्यक्ष संजू परब, मनोज नाईक, महेश धुरी, आनंद नेवगी, प्रथमेश तेली आदी उपस्थित होते.
तेली म्हणाले, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी माझे जवळचे संबंध आहेत, असे मंत्री दीपक केसरकर रोज सांगतात. मग त्या मैत्रीपुर्ण संबंधाचा फायदा उठवून मतदार संघातील लोकांना दिलेली आश्वासने आणि प्रलंबित प्रश्न तरी किमान सोडवा, यासाठी तुम्हाला अडविले कोणी? मी जाहीर केल्या प्रमाणे फाऊंटनचा प्रकल्प हा सावंतवाडीत घेऊन येणारच असे आश्वासन तेली यांनी दिले. या प्रकल्पात अनेकजण खो घालत आहेत पण आता गप्प बसणार नाही प्रकल्प आणणारच असा टोला मंत्री केसरकर यांचे नाव न घेता लगावला.
आश्वासने देवून लोकांची फसवूणक होत असेल तर आंदोलने होणारच. त्यामुळे विकास करताना सर्वाना विश्वासात घेणे गरजेचे आहे. डी. एड आंदोलन करणार्या उमेदवारांकडे सत्ताधारी लक्ष देत नाही, अशी ओरड आहे. याबाबत त्यांना विचारले असता सिंधुदुर्ग जिल्हा हा डोंगराळ आहे. त्यामुळे वेगळे निकष लावून हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केला जावा, अशी मागणी आपण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यां सह पालकमंत्री व प्रदेशाध्यक्षांकडे केली आहे. या प्रश्नात मंत्री म्हणून केसरकरांनी तात्काळ लक्ष घालून त्यांच्या मागण्या पुर्ण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असेही तेली म्हणाले.