Sindhudurg: ठाकरे गट शिवसेना, भाजप पदाधिकारी एकमेकांना भिडले; पावशी गावात तणाव
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2023 01:40 PM2023-04-12T13:40:36+5:302023-04-12T13:41:02+5:30
वादंग चालू असताना आमदार वैभव नाईक यांनी नळपाणी योजनेचे भूमिपूजन केले
कुडाळ : पावशी गावात जलजीवन मिशन अंतर्गत नळपाणी योजनेच्या भूमिपूजनावेळी ठाकरे गट शिवसेना व भाजप पदाधिकारी एकमेकांना भिडले. यावेळी मोठ्या प्रमाणात शाब्दिक बाचाबाची झाली. दोन्हीही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पावशी मिटक्याची वाडी येथे जलजीवन मिशन अंतर्गत नळपाणी योजनेतील कामांच्या भूमिपूजनासाठी आमदार वैभव नाईक आले होते. यावेळी उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी, बाळा कोरगावकर, सरपंच वैशाली पावसकर, उपसरपंच लक्ष्मीकांत तेली, युवासेना जिल्हा समन्वयक सुशील चिंदरकर, युवा सेना उपतालुकाप्रमुख सागर भोगटे, कृष्णा तेली, संतोष अडूलकर, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
यावेळी उपस्थित असलेले भाजपाचे पदाधिकारी व पावशीचे माजी सरपंच श्रीपाद तवटे, रुणाल कुंभार, रमेश कुंभार, स्वरूप वाळके, राजन जाधव, ओंकार करगुटकर, हेमंत तवटे, समीर तेली, राजा चव्हाण तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी येथील काम बंद आदेश आहे. त्यामुळे भूमिपूजन करू नका, असे सांगितले, यानंतर ठाकरे गट व भाजप पदाधिकारी यांच्यात जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली. यानंतर काही वेळाने आमदार नाईक यांनी या कामाचे भूमिपूजन केले.
यासंदर्भात भाजपचे पदाधिकारी व पावशीचे माजी सरपंच श्रीपाद तवटे यांनी सांगितले की, या ठिकाणी केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन अंतर्गत नळपाणी योजनेतून फक्त पाइपलाइन मंजूर आहे; परंतु येथील धनगर माळावरती असलेल्या मुख्य पाइपलाइनने पाणी या ठिकाणी पोहोचत नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी वारंवार येथील नळ पाणी योजनेची पाइपलाइन घालू नये याकरिता ग्रामपंचायत तसेच लोकप्रतिनिधींकडे "काम बंद' करण्याची मागणी केली होती. ज्या विभागाकडून काम चालू आहे. त्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून काम बंद'चे आदेश तोंडी देण्यात आले होते.
असे असतानाही आमदार वैभव नाईक हे या ठिकाणी काम सुरू करण्यासाठी उपस्थित होते. येथील कामाचे भूमिपूजन केल्यावर ते काम चालू होईल अशी त्यांची अपेक्षा होती. परंतु या ठिकाणी जमलेल्या ग्रामस्थांनी याला मोठ्या प्रमाणात विरोध केला. ग्रामस्थ व त्या ठिकाणी आलेले लोकप्रतिनिधी किंवा राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांमध्ये वादंग चालू असताना आमदारांनी पाठीमागे गुपचूप नारळ वाढवून, भूमिपूजन करून ते निघून गेले, अशी प्रतिक्रिया श्रीपाद तवटे यांनी व्यक्त केली.