कुडाळमध्ये ठाकरे सैनिक, भाजप कार्यकर्ते आमने सामने; राजकीय वातावरण तापले, पोलिस बंदोबस्त वाढवला
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: February 4, 2024 04:42 PM2024-02-04T16:42:18+5:302024-02-04T16:45:10+5:30
आमने-सामने घोषणाबाजी झाल्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले. पोलिस प्रशासनालाही मोठी कसरत करावी लागली.
कुडाळ (सिंधुदुर्ग) : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मोटर सायकल रॅलीच्या वेळी भाजप कार्यालयाकडे रॅली आली आली असता भाजप पदाधिकारी व शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार घोषणाबाजी झाली. आमने-सामने घोषणाबाजी झाल्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले. पोलिस प्रशासनालाही मोठी कसरत करावी लागली.
उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख यांच्या कुडाळ येथील काॅर्नर सभेत भाजपा व आमच्या नेत्यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केल्यास आम्ही सभा उधळवुन लावु असा इशारा भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी दिल्यानंतर कुडाळ येथे राजकीय वातावरण तापले आहे .कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये या करीता पोलिस प्रशासनाने भाजप व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे पदाधिकाऱ्यांना नोटीसा बजावल्या असल्याची माहिती कुडाळ पोलिस ठाण्यातून देण्यात आली.
कुडाळ पोलिस निरीक्षक यांना शनिवारी सायंकाळी भाजपा पदाधिकाऱ्यांनी निवेदनातुन कुडाळ शहरात ठाकरे यांची सभा वर्दळीचा ठिकाणी घेवु नये असे निवेदन दिले होते.
येथील सभेत भाजपा व आमच्या नेत्यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केल्यास आम्ही सभा उधळवुन लावु असा इशारा भाजपाच्या पदाधिकऱ्यांनी दिल्यानंतर ठाकरे यांच्या सभेपूर्वीच सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना-भाजप मध्ये राजकीय संघर्ष सुरू झाल्यासारखे वातावरण होते. मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ही संपुर्ण शहरात व कार्यक्रम ठिकाणी ठेवण्यात आला.