यापुढे भाजपचाच खासदार, तुम्हाला संधी नाही; नारायण राणेंचा विनायक राऊतांना इशारा
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: April 3, 2024 07:19 PM2024-04-03T19:19:43+5:302024-04-03T19:20:45+5:30
'पुढील ३५ दिवस २४ तास प्रचार करा'
कुडाळ : यापुढे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात भाजपचाच खासदार असेल. परत तुम्हाला संधी नाही, असं आम्ही ठरवलं आहे, असा इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी बुधवारी कुडाळ येथे विद्यमान खासदार विनायक राऊत यांना दिला. तसेच कोरोना काळात उद्धवसेनेच्या नेत्यांनी मुंबई महापालिकेत औषधाचा घोटाळा केला आहे. याप्रकरणी लवकरच दोघेही पिता-पुत्र जेलमध्ये जातील, असा टोलाही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांना लगावला.
कुडाळ येथील महालक्ष्मी सभागृहात बुधवारी भाजपाची संघटनात्मक बैठक झाली. यावेळी राज्याचे बांधकाममंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नितेश राणे, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी खासदार नीलेश राणे, माजी आमदार अजित गोगटे, प्रमोद जठार, बाळ माने, राजन तेली, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, रणजित देसाई, दत्ता सामंत, संघटक शैलेश दळवी, महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, राजू राऊळ, अशोक सावंत तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.
राणे म्हणाले, या खासदाराने आतापर्यंत काय विकासाची कामे केली, हे जाहीर करावे. इथल्या स्थानिक आमदारानेही १० वर्षात विकासाच्या दृष्टीने शून्य काम केले. फक्त नारायण राणे, नीलेश राणे, नितेश राणे यांच्यावर तोंडसुख घेणे, त्यांच्यावर टीका करणे हे त्यांचे काम आहे. आता मी आलोय, आमच्याबद्दल घाणेरडा बोलता, कौतुक नाही तर बोलू नका, यापुढे असं बोलला तर मीसुद्धा जशास तसे उत्तर देईन, असा इशाराही राणे यांनी दिला. माजी आमदार प्रमोद जठार, राजन तेली यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन रणजीत देसाई यांनी केले, तर आभार जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी मानले.
पुढील ३५ दिवस २४ तास प्रचार करा
यावेळी पालकमंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले की, अबकी बार ४०४. देशाला नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व हवे आहे, हे गावागावात घराघरात जाऊन सांगा. त्यांनी जे काम केले त्या दिशेने जाणं महत्त्वाचं आहे. प्रत्येक कार्यकर्त्यांनी निवडणूक स्वतःच्या खांद्यावर घ्यावी. भाजपचा खासदार जिंकून येण्यासाठी इथून पुढे ३५ दिवस २४ तास प्रचार करा. बुथवर एनडीएच्या उमेदवारासाठी ८० टक्के मतदान मिळण्यासाठी प्रयत्न करा. विरोधकांना मतदान मिळणार नाही हे पटवून द्या.
निवडणुकीत गालबोट लागू देऊ नका
आमदार नितेश राणे यांनी आपला खासदार निवडून येण्यासाठी रणनीती तयार करा. नमस्कार चमत्कार करा, साम-दाम-दंड-भेद नीती अवलंबून निवडणुकीत गालबोट लागू देऊ नका. मतदारांना मतदान केंद्रापर्यंत नेण्यासाठी काम करा. नीलेश राणे यांनी विद्यमान खासदार यांनी काय केलं याचा पाढा वाचा, चर्चा करा आपली दहा वर्षे फुकट गेली. विद्यमान खासदार काय करू शकले नाहीत आपल्याला संसदेत प्रश्न मांडणारा, बोलणारा खासदार पाठवायचा आहे, हे पटवून देण्याचे आवाहन केले.