ठाकरे सेना पक्षच काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा प्रस्ताव, नितेश राणे यांचा दावा
By सुधीर राणे | Published: December 30, 2023 06:56 PM2023-12-30T18:56:33+5:302023-12-30T18:56:55+5:30
कणकवली : संजय निरुपम यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांचा शिवसेना पक्ष यांची योग्यता दाखवून दिली आहे. काँग्रसने उद्धव ...
कणकवली : संजय निरुपम यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांचा शिवसेना पक्ष यांची योग्यता दाखवून दिली आहे. काँग्रसने उद्धव ठाकरेंची क्षमता चांगलीच ओळखली आहे. त्यामुळेच उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा प्रस्ताव देण्यात आलेला आहे. असा दावा आमदार नितेश राणे यांनी केला आहे.तसेच ते खोटे असल्यास उद्धव ठाकरे व संजय राऊत यांनी बाळासाहेबांची शपथ घेऊन खुलासा करावा. असे आव्हान देखील दिले आहे.
कणकवली येथे शनिवारी प्रसिद्धी माध्यमांशी आमदार नितेश राणे यांनी संवाद साधला. ते म्हणाले, ठाकरे सेना पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करा, असा प्रस्ताव काँग्रेसकडून आलेला आहे. विधानसभेच्या पाच जागा मिळविणे कठीण झालेल्या उद्धव ठाकरेंना त्यांचा पक्षच विलीन करण्याची ऑफर आलेली आहे.
प्रकाश आंबेडकर यांचा विषय महत्वाचा नाही, असे संजय राऊत यांनी इंडिया अलायन्सच्या बैठकीत सांगितले. यातून प्रकाश आंबेडकर यांना कमी लेखायचे काम संजय राऊत करत आहेत. राज्याच्या राजकारणात उद्धव ठाकरेंचे नाव पुढील काळात दिसणार नाही. असा शाप श्री राम देईल, कारण ते वारंवार खोटे बोलत आहेत. असा आरोपही राणे यांनी यावेळी केला.
कोल्हेंच्या नावासमोर माजी खासदार लागायला वेळ लागणार नाही
पैसे घेऊन संभाजी महाराजांची भूमिका करणाऱ्या अमोल कोल्हेनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलू नये. तर ज्या अजित पवार यांच्या आशीर्वादाने अमोल कोल्हे खासदार झाले, त्यांच्याबद्दल त्यांनी विचार करून बोलावे. खाल्या मिठाला जागावे. अन्यथा त्यांच्या नावासमोर माजी खासदार हे नाव लागायला वेळ लागणार नाही. असा टोलाही राणे यांनी लगावला. येणाऱ्या निवडणुकांच्या जागा वाटपाबाबत वरिष्ठ निर्णय घेतील.