Sindhudurg: घनदाट जंगलात साखळदंडाने बांधलेल्या 'त्या' अमेरिकी महिलेला उपचारासाठी गोव्याला हलविले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 01:50 PM2024-07-29T13:50:56+5:302024-07-29T13:52:05+5:30
अद्याप जबाब नोंदविण्यात आला नाही : तपास बांदा पोलिसांकडे
सावंतवाडी (जि. सिंधुदुर्ग) : रोणापाल-सोनुर्ली येथील घनदाट जंगलात शनिवारी एक विदेशी महिला साखळदंडाने बांधलेल्या अवस्थेत आढळून आली होती. या महिलेवर सध्या ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, अधिक उपचारार्थ या महिलेला गोवा-बांबोळी येथील मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयात हलविण्यात येणार असल्याची माहिती बांदा पोलिस निरीक्षक दत्तात्रय बडवे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, या महिलेची प्रकृती अद्याप सुधारली नसल्याने तिचा जबाब नोंदविण्यात आला नसल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात आले.
शनिवारी मूळ अमेरिकन पण सध्या तामिळनाडूमध्ये वास्तव्याला असणारी ललिता कायी कुमार एस. ही महिला रोणापाल येथील घनदाट जंगलात एका झाडाला साखळदंडाने बांधलेल्या अवस्थेत गुराख्याला आढळून आली होती. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन महिलेची साखळदंडातून मुक्तता केली आणि येथील कुटीर रुग्णालयात दाखल केले.
मात्र, महिलेची प्रकृती गंभीर असल्याने तिला जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले होते. तेथे तिच्यावर उपचार सुरू आहेत; पण अद्यापपर्यंत तिची प्रकृती सुधारत नसल्याने पोलिसांनी तिला गोवा-बांबोळी येथील शासकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी रात्री उशिरापर्यंत तिला या ठिकाणी दाखल करण्यात येणार आहे.
दरम्यान, ही महिला रोणापालपर्यंत आली कशी याबाबतची माहिती पोलिस गोळा करत आहेत. तिचा जबाब नोंदविण्यात आला नसल्याने पोलिसांना यात माहिती गोळा करणे कठीण होत आहे. हा जबाब पुढील चार दिवसांत नोंदविण्यात येणार असल्याचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय बडवे यांनी स्पष्ट केले आहे.
महिलेच्या तोंडात पतीचे नाव
पोलिसांकडून प्राथमिक तपास म्हणून काही प्रश्न या महिलेला विचारण्यात आले. त्यावेळी त्या महिलेने हे कृत्य पतीकडून केले असेच म्हणाली होती. त्यावरून पोलिस तिच्या कुटुंबाविषयी माहिती घेत आहेत.