..त्यामुळेच खोटे बोलून जनतेची दिशाभूल करतायत, नितेश राणे यांची महाविकास आघाडीवर टीका
By सुधीर राणे | Published: October 7, 2024 04:17 PM2024-10-07T16:17:06+5:302024-10-07T16:17:36+5:30
'महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या घरातील दिवाळी अंधारात जाण्याची वेळ'
कणकवली: 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'मुळे महायुती सरकार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांबद्दल राज्यातील जनतेच्या मनात प्रेम, आपुलकी निर्माण झाली आहे. त्यामुळे विरोधी पक्ष असलेल्या महाविकास आघाडीची झोप उडाली आहे. त्यांना ही योजनाच बंद करायची आहे. त्यामुळेच या योजनेसंदर्भात खोटे बोलून ते जनतेची दिशाभूल करत आहेत अशी टीका आमदार नितेश राणे यांनी केली आहे. कणकवली येथे आज, सोमवारी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
राणे म्हणाले, प्रथम खोटे बोलायचे आणि त्यानंतर न्यायालयासमोर अटक करू नका असे सांगत माफी मागायची, यात संजय राऊत यांनी प्रथम क्रमांक मिळवला आहे. मध्यप्रदेशमध्ये लाडकी बहीण योजना सुरळीत चालू आहे. सर्व भगिनींना चांगल्या प्रकारे दर महिन्याला लाभ मिळतो आहे. असे असताना संजय राऊत ही योजना मध्यप्रदेशमध्ये बंद झाली अशी खोटी माहिती देत असतील तर त्यांनी याबद्दलचा एक तरी पुरावा द्यावा. अन्यथा महाराष्ट्रातील भगिनींची माफी मागावी. असे आव्हान आमदार राणे यांनी दिले.
उद्धव ठाकरे यांचे सरकार 'शक्ती' कायदा आणू शकले नाही
प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांनीही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे कौतुक केले. यातूनच महायुती सरकारचे यश दिसून येते. त्यामुळे संजय राऊत यांच्यासारख्या लोकांनी त्याबाबत विनाकारण बोलू नये. उद्धव ठाकरे यांचे सरकार असताना ते साधा 'शक्ती' कायदा आणू शकले नाहीत. हे त्यांचे मोठे अपयश आहे.
महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या घरातील दिवाळी अंधारात जाण्याची वेळ
संजय राऊत हे ठेकेदारांचे दलाल झालेले आहेत. राज्यातील सध्याच्या परिस्थितीवरून महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या घरातील दिवाळी अंधारात जाण्याची वेळ आली आहे. त्यांना मोती साबण घेणे पण जड झाले आहे. त्यामुळे ते लाडकी बहीण योजनेबद्दल गळा काढत फिरत आहेत. असेही राणे म्हणाले.