..म्हणूनच भाजपकडून उत्तर भारतीयांच्या संघटनेची स्थापना, मनसे नेते परशुराम उपरकर यांचा आरोप
By सुधीर राणे | Published: November 10, 2023 05:49 PM2023-11-10T17:49:22+5:302023-11-10T17:50:05+5:30
सिंधुदुर्गात उत्तर भारतीयांचे लोण भाजपमुळेच
कणकवली: सिंधुदुर्ग जिल्हा निर्मितीनंतर आजवर भाजप वगळता एकाही पक्षाने परप्रांतीयांच्या संघटनेची मोट बांधली नाही. मात्र, आता मतपेटीवर डोळा ठेवून भाजप उत्तर भारतीयांची संघटना बांधून नेमके काय सिद्ध करू पाहत आहे ? असा सवाल करतानाच सिंधुदुर्गात उत्तर भारतीयांचे लोण भाजपमुळेच जास्त पसरत असल्याची स्थिती आहे असा आरोप मनसे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला.
कणकवली येथील मनसे संपर्क कार्यालयात शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. उपरकर म्हणाले, चोरी, दरोडे, अत्याचार आदी गुन्हेगारी आणि गुन्हेगार यांचा विचार केल्यास अलीकडच्या काळात उत्तर प्रदेश, बिहार मधील गुन्हेगारच सर्वत्र जास्त प्रमाणात आढळत आहेत. परप्रांतीयांनी सिंधुदुर्गातील युवकांचा रोजगार हिरावून घेतला आहे. एकीकडे आमदार नितेश राणे परप्रांतीयांविरोधात बोलत असताना दुसरीकडे भाजपाचे पदाधिकारी मात्र उत्तर भारतीयांची संघटना स्थापन करून त्यांचे लाड करत आहेत. या परप्रांतीयांची नोंदणी सुद्धा रीतसर पोलिस यंत्रणेकडे होत नाही. त्याकडेही पोलिस अधीक्षकांचे लक्ष मनसे वेधणार आहे. वेळप्रसंगी त्यासाठी रस्त्यावरही उतरणार असल्याचे उपरकर म्हणाले.
ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वाधिक सरपंच आणि सदस्य भाजपचे निवडून आले. याची दिवाळी भेट म्हणून परप्रांतीयांची संघटना भाजप निर्माण करीत आहे काय ? जिल्ह्यात गरीब, अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेण्यामध्ये याच परप्रांतीयांची नावे मोठ्या प्रमाणात समोर येतात. परप्रांतियांकडे यावेळी दुर्लक्ष केल्यास भविष्यात उत्तर भारतीय सरपंच सुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यात होईल. अशी सध्याची स्थिती आहे.
उत्तर भारतीयांचे लोण जिल्ह्याभर भाजप पसरवत आहे. जिल्हावासीयांनी एकत्रितपणे ते रोखायला हवे, अन्यथा पुढील काळात पश्चाताप करायची वेळ येईल. परप्रांतीयांची संघटना करून भाजप मतांची बेरीज करीत असेल तर त्याला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांनी एकत्रितपणे उत्तर देण्याची गरज आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी परप्रांतीयांबाबतच्या आपल्या तक्रारी मनसेकडे द्याव्यात. परप्रांतीयांच्या अन्याया विरोधात नागरिकांनी आंदोलन करावे, मनसे त्याला निश्चितच पाठींबा देईल असेही उपरकर म्हणाले.