मॉरिशसला ‘कोमसाप’चे १७ वे केंद्रीय मराठी साहित्य संमेलन, संमेलनाच्या अध्यक्षपदी विजय कुवळेकर

By सुधीर राणे | Published: November 20, 2023 04:05 PM2023-11-20T16:05:21+5:302023-11-20T16:05:56+5:30

संमेलनाचे उद्घाटन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते होणार

The 17th Central Marathi Literary Conference of Konkan Marathi Sahitya Parishad will be held in Mauritius | मॉरिशसला ‘कोमसाप’चे १७ वे केंद्रीय मराठी साहित्य संमेलन, संमेलनाच्या अध्यक्षपदी विजय कुवळेकर

मॉरिशसला ‘कोमसाप’चे १७ वे केंद्रीय मराठी साहित्य संमेलन, संमेलनाच्या अध्यक्षपदी विजय कुवळेकर

कणकवली: मॉरिशस सरकारच्या कला व सांस्कृतिक वारसा मंत्रालय,  मॉरिशस मराठी मंडळी फेडरेशन, मॉरिशस मराठी कल्चरल सेंटर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने कोकण मराठी साहित्य परिषद अर्थात ‘कोमसाप’चे १७ वे केंद्रीय मराठी साहित्य संमेलन येत्या २ व ३ डिसेंबर रोजी मॉरिशस येथे होणार आहे. याबाबतची माहिती 'कोमसाप’चे केंद्रीय कार्याध्यक्ष प्रा. डॉ. प्रदीप ढवळ यांनी येथे दिली.

 तसेच ‘आंतरराष्ट्रीय हृदयंगम मराठी साहित्य संमेलन’असे या संमेलनाचे नामकरण करण्यात आले असून या दोन दिवसीय संमेलनाच्या माध्यमातून मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती यांचा जागर मॉरिशसच्या भूमीवर होणार आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ संपादक, लेखक विजय कुवळेकर यांची निवड करण्यात आली असून संमेलनाचे उद्घाटन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते होणार आहे.

कणकवली येथे सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. ढवळ बोलत होते. यावेळी 'कोमसाप’च्या केंद्रीय मंडळाच्या उषा परब, जिल्हाध्यक्ष मंगेश म्हस्के, संदीप वालावलकर उपस्थित होते.

प्रा.डॉ. ढवळ म्हणाले, कोकण मराठी साहित्य परिषद  ही संस्था मराठी भाषा व साहित्याच्या प्रसारासाठी गेल्या तीन दशकांहून अधिक काळ कार्यरत आहे. संस्थेचे संस्थापक ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली आजवर विविध साहित्य संमेलने व साहित्यिक-सांस्कृतिक उपक्रमांद्वारे ‘कोमसाप’ मराठी भाषा, साहित्य व संस्कृतीच्या जतन-संवर्धनासाठी अखंडपणे सक्रिय आहे. मॉरिशस येथील मॉरिशस मराठी मंडळी फेडरेशन, मॉरिशस मराठी कल्चरल सेंटर ट्रस्ट आणि मॉरिशस सरकारच्या कला व सांस्कृतिक वारसा मंत्रालयांतर्गत कार्यरत मराठी स्पीकिंग युनियन यांनी कोकण मराठी साहित्य परिषदेला मॉरिशस येथे मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्याकरिता निमंत्रित केले आहे. त्यानुसार मॉरिशसमधील या संस्थांसमवेत ‘कोमसाप’ने येत्या २ व ३ डिसेंबर २०२३ रोजी मॉरिशस येथे दोन दिवसीय मराठी साहित्य संमेलन आयोजित केले आहे. 

तीन दशकांपूर्वी मॉरिशस येथे विश्व मराठी साहित्य संमेलन झाले होते, त्यानंतर आता मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती यांचा जागर पुन्हा मॉरिशसच्या भूमीवर या संमेलनाच्या माध्यमातून होणार आहे. मराठी भाषा, साहित्य, कला व संस्कृतीची ओळख नव्याने मॉरिशसच्या जनतेला करून देऊन मॉरिशस आणि महाराष्ट्र व पर्यायाने भारत यांच्यातील सांस्कृतिक आदान-प्रदान वृद्धिंगत करण्याचा या संमेलनामागील हेतू आहे.
 ‘कोमसाप’च्या या १७ व्या केंद्रीय मराठी साहित्य संमेलनाचे नामकरण ‘आंतरराष्ट्रीय हृदयंगम मराठी साहित्य संमेलन’ असे करण्यात आले आहे.  संमेलनाचे स्वागताध्यक्षपद निशी हिरू भूषवणार आहेत.

‘कोमसाप’चेसंस्थापक व ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष विनय सहस्रबुद्धे, मॉरिशसचे सांस्कृतिक कार्यमंत्री अविनाश तीललूक, मॉरिशसचे परराष्ट्र मंत्री अॅलन गानू, मॉरिशसच्या शिक्षण मंत्री लीलादेवी दुकून लाचूमान, ‘कोमसाप’च्या केंद्रीय अध्यक्ष नमिता कीर, केंद्रीय कार्याध्यक्ष प्रा. डॉ. प्रदीप ढवळ, नियामक मंडळ सदस्य आमदार संजय केळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या संमेलनात महाराष्ट्र आणि मॉरिशस येथील मान्यवर साहित्यिक, कवी, लेखक, कलावंत, रंगकर्मी, माध्यमकर्मी, भाषा व साहित्याचे अभ्यासक मंडळी सहभागी होणार आहेत.

या दोन दिवसीय संमेलनाच्या पहिल्या दिवशी संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याबरोबरच ग्रंथदिंडी, ग्रंथ प्रकाशन व प्रदर्शन, आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर ‘देशविदेशातील मराठी भाषेचे जतन’ या विषयावरील परिसंवाद आणि निमंत्रितांचे कवी संमेलन होणार आहे. तर संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी ‘वाचन : बदलता दृष्टिकोन आणि स्वरूप’ या विषयावरील परिसंवादाबरोबरच मान्यवरांच्या मुलाखती तसेच कलाविष्कार व सांस्कृतिक कार्यक्रमांची सत्रे होणार आहेत. या संमेलनातून मराठी साहित्य, कला, भाषा व आपल्या संस्कृतीचा सर्जनशील आविष्कार सादर करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे ‘कोमसाप’कडून यावेळी सांगण्यात आले.

Web Title: The 17th Central Marathi Literary Conference of Konkan Marathi Sahitya Parishad will be held in Mauritius

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.