आरोपीला ही महालात प्रवेश करत असल्याचा भास; कारागृहाला राजेशाही साज
By अनंत खं.जाधव | Published: December 31, 2023 08:20 PM2023-12-31T20:20:30+5:302023-12-31T20:21:37+5:30
सावंतवाडीतील संस्थानकालीन कारागृहाला राजेशाही साज : कारागृह अधीक्षकांची संकल्पना
सावंतवाडी : सावंतवाडीतील संस्थानकालीन कारागृहाचे रूपडे पालटले जात असून सातारा कारागृहाच्या धर्तीवर सावंतवाडी कारागृहाच्या प्रवेशद्वाराला राजेशाही साज चढविण्यात आला आहे. त्यामुळे या प्रवेशद्वाराकडे बघितल्यानंतर एखाद्या आरोपीला ही महालात प्रवेश करत असल्याचा भास होतो.हे प्रवेशद्वार कुडाळ तालुक्यातील आकेरी येथे बनविण्यात आले असून आठवड्यापूर्वीच कारागृहाला बसविण्यात आला आहे.
सावंतवाडी कारागृहाची ओळख ही संस्थानकालीन कारागृह म्हणून आहे. या कारागृहाची आतील रचना पूर्णपणे संस्थानकालीन असून आज ही कारागृहाची विद्युत सेवा किंवा पाण्याच्या पाईपलाईन विहीर आदि संस्थानकालीनच आहेत.मात्र या कारागृहाचे प्रवेशद्वार खराब झाले होते.तसेच आतील काहि वस्तू ही खराब झाल्या आहेत त्यामुळे याची डागडुजी व्हावी यासाठी कारागृह प्रशासन सतत पाठपुरावा करत होता. त्याच्या पाठपुराव्याला यश आले असून आलिकडेच या कारागृहाचा दरवाजा बदलण्यात आला आहे या साठी कारागृह प्रशासनाने जिल्हाधिकारी यांना पत्र दिले होते.त्या नंतर या कामाला जिल्हाधिकारी यांनी परवानगी दिल्यानंतर स्वता कारागृह अधीक्षक संदिप एकशिंगे यांनी पुढाकार घेत दरवाज्याची कलाकुसर कशी असावी याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाला दिली तसे अंदाजपत्रक ही तयार करून घेतले यासाठी सात लाख रूपयांचा निधी ही मंजूर झाला होता.त्यात हे प्रवेशद्वार तयार करण्यात आले आहे.
सातारा येथील कारागृहाला ज्या प्रमाणे प्रवेशद्वार आहे तसेच प्रवेशद्वार तयार करण्यात यावे असे सुचविण्यात आल्यानंतर कुडाळ तालुक्यातील आकेरी येथील कारागिरानी हे प्रवेशद्वार तयार केले असून आलिकडेच हे कारागृहाला बसविण्यात आले आहे.कारागृह शहरांच्या दर्शनी भागात असल्याने या कारागृहाकडेच सगळ्यांच्या नजरा जात असतात.
एखाद्या आरोपीला ही कारागृहात प्रवेश करतना एखाद्या महालात प्रवेश करत असल्याचा भास होतो.या आकर्षक प्रवेशद्वारा मुळे संस्थानकालीन कारागृहाचे रूपडे ही पालटून गेले आहे. याबाबत कारागृह अधीक्षक संदिप एकशिंगे यांना विचारले असता कारागृहाचा दरवाजा खराब झाला होता.नवीन दरवाजा हा संस्थानकालीन कारागृहाला शोभून दिसेल असा असला पाहिजे म्हणूनच मी या कारागृहाचा दरवाजा हा सातारा कारागृहाच्या धर्तीवर बनविण्याचा निर्णय घेतला त्याला जिल्हाधिकारी यांनी साथ दिली तसेच हा दरवाजा आकेरी येथे बनविण्यात आल्याचे एकशिंगे यांनी सांगितले आहे.