Sindhudurg: राजकोट किल्ल्यावरील शिवपुतळा उभारणीस प्रारंभ, काम कधी पूर्ण होणार.. जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 16:14 IST2025-03-04T16:14:30+5:302025-03-04T16:14:30+5:30
भल्या मोठ्या क्रेन किल्ले राजकोट येथे दाखल

Sindhudurg: राजकोट किल्ल्यावरील शिवपुतळा उभारणीस प्रारंभ, काम कधी पूर्ण होणार.. जाणून घ्या
मालवण : मालवण किनारपट्टीवरील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारणीचे काम राज्य शासनाच्या माध्यमातून राम सुतार आर्ट्स क्रिएशन या राष्ट्रीय स्तरावरील नावलौकिक प्राप्त कंपनीमार्फत सुरू आहे. पुतळ्यासाठी चौथरा उभारणी पूर्ण झाल्यानंतर महाराजांचा पुतळा उभारणीच्या प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली. यावेळी शिल्पकार अनिल सुतार यांनी चौथऱ्यावर विधीवत पूजा केल्यानंतर पुतळा उभारणीच्या कामास प्रारंभ करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराज खडकावर उभे असल्याचे दाखविण्यात आले असून, याच खडकाचे भाग सर्वप्रथम चौथऱ्यावर क्रेनच्या साहाय्याने ठेवण्यात आले. मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्याचे काम सुरू आहे. पुतळ्यासाठी चौथरा बांधल्यानंतर शिवजयंतीदिनी पालकमंत्री नितेश राणे, आमदार नीलेश राणे यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत पायाभरणी करण्यात आली होती.
ब्रांझचा खडक चौथऱ्यावर
पुतळा उभारणीच्या कामास सुरुवात करण्यात आली. शिल्पकार अनिल सुतार यांच्या हस्ते आणि आरवली सोन्सुरे येथील शिवचैतन्य गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली चौथऱ्यावर पुतळा उभारणी होत असताना विधीवत पूजा करण्यात आली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मालवणचे अभियंता अजित पाटील यांच्यासह बांधकाम विभागाचे अधिकारी, तसेच काम करणारे कारागिर उपस्थित होते. यावेळी मोठ्या क्रेनच्या साहाय्याने पुतळ्याचा बेस असलेला तयार केलेला ब्रांझचा खडक चौथऱ्यावर बसविण्यात आला.
पुतळा उभारणीचे काम ४५ ते ६० दिवसांत पूर्ण होईल
यावेळी अनिल सुतार म्हणाले, हा आंनदाचा क्षण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा ८३ फूट उंच भव्य पुतळा उभारणीचे काम ४५ ते ६० दिवसांत पूर्ण होईल. १५ एप्रिलपर्यंत आम्ही हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. महाराजांचा पूर्णाकृती तलवारधारी स्वरूपातील हा सर्वात उंच पुतळा आहे. या पुतळ्यासाठी उत्तम दर्जाचे ब्रॉन्झ आणि स्टील वापरण्यात आले आहे. त्यामुळे हा पुतळा अनेक वर्षे टिकणारा असेल.
बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे सहकार्य
हा पुतळा समुद्रकिनारी असल्याने वाऱ्याचा प्रभाव पाहता, या पुतळ्याची विंड टनेल टेस्ट ऑस्ट्रेलिया येथे करण्यात आली असून, त्याचे सकारात्मक रिझल्ट आले आहेत, असेही अनिल सुतार म्हणाले. या पुतळ्याच्या कामासाठी राज्य शासन, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभत आहे. मालवणमधील नागरिकांचे आम्हाला सहकार्य मिळत आहे, येथे उत्कृष्ट दर्जाचा पुतळा उभा राहणार आहे, असेही ते म्हणाले.
प्रतिकृती राम सुतार यांच्याच देखरेखीखाली
राजकोट येथे उभारण्यात येत असलेल्या शिवपुतळ्याची छोटी मुख्य प्रतिकृती राम सुतार यांच्याच देखरेखीखाली तयार करण्यात आली. राम सुतार हे दिल्लीत असून प्रकृतीमुळे ते कुठे फिरत नाहीत. मात्र, राजकोट येथील महाराजांच्या पुतळ्याचे काम त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व करत आहोत, असे अनिल सुतार म्हणाले.