पावसाचा जोर ओसरला, सिंधुदुर्गात शेतीची कामे आली शेवटच्या टप्प्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2022 07:12 PM2022-07-16T19:12:04+5:302022-07-16T19:12:34+5:30
पाउस दिवसभरात अधूनमधून सरींच्या रूपाने बरसत आहे.
सिंधुदुर्ग : जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. रात्रीच्या वेळी संततधार पडत असलेला पाउस दिवसभरात अधूनमधून सरींच्या रूपाने बरसत आहे. मात्र, पावसाचा जोर ओसरल्याने शेतीची कामेही आता शेवटच्या टप्प्यात आली आहेत.
गेल्या चौवीस तासात वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक ५२.८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी ३१.१ मि.मी. पाऊस झाला आहे. तर एकूण सरासरी १७०५.५ मि.मी. पाऊस झाला आहे.
तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. देवगड-१९.९ (१४११.७), मालवण-२३.३ (१६१०.५), सावंतवाडी-३५.२ (२०३४.६), वेंगुर्ला- १८.७ (१७५४.२), कणकवली-४४.३ (१५७२.७), कुडाळ-३१.२(१८३२.४), वैभववाडी- ५२.८ (१७५९.४), दोडामार्ग- ३३.३ (१९४३.१) असा पाऊस झाला आहे.
शुक्रवारी सकाळी ८ वा. मोजण्यात आलेल्या नदीपातळीनुसार - तिलारी नदीची पाणीपातळी तिलारीवाडी येथे ३९.८०० मी. आहे. या नदीची धोका पातळी ४३.६०० मीटर इतकी आहे. कर्ली नदीची पातळी भंकसाळ नदी पुलाजवळ ६.५०० मीटर आहे. धोका पातळी १०.९१० मीटर इतकी आहे. खारेपाटण पुलाजवळ वाघोटन नदीची पातळी ३.९०० मीटर इतकी असून धोका पातळी १०.५०० मीटर इतकी आहे. गडनदीची पातळी ३४.८०० मीटर इतकी असून धोका पातळी ३७.९२० मीटर इतकी आहे.
तिलारी धरण ८५ टक्के भरले
तिलारी-आंतरराज्य प्रकल्पाच्या क्षेत्रात गेल्या चोवीस तासात ५३.२० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सध्या या प्रकल्पामध्ये ३७७.९९५ द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण ८४.४९ टक्के भरले आहे. सध्या हा धरणातून एकूण ६ हजार २७८.६१२ क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यातील मध्यम व लघू पाटबंधारे, मृद व जलसंधारण प्रकल्पांमध्ये पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. तर जिल्ह्यातील नद्यांमधील पाणी पातळी आता वाढली असली तरी कुठलीही धोक्याच्या पातळीवर नाही. पावसाचा जोर ओसरला आहे.