राजकीय मतभेद बाजूला ठेवून सकारात्मक विकास करणे हेच उद्दीष्ट : पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2022 07:15 PM2022-02-21T19:15:52+5:302022-02-21T19:16:19+5:30
तारकर्ली, मालवण येथे स्कुबा डायव्हिंगच्या अत्याधुनिक बोटीचे केले लोकार्पण
सिंधुदुर्गनगरी : एकाद्या परिसराचा विकास करत असताना होणारा विकास हा सकारात्मक आणि शाश्वत असणे हे महत्वाचे असल्याचे प्रतिपादन पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले. तारकर्ली, मालवण येथे स्कुबा डायव्हिंगच्या अत्याधुनिक बोटीच्या लोकार्पण सोहळ्यावेळी ते बोलत होते. राजकीय मतभेद बाजूला ठेवून सकारात्मक विकास करणे हेच उद्दीष्ट असल्याचेही ते म्हणाले.
यावेळी पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, दीपक केसरकर, पर्यटन सचिव वल्सा नायर, सचिव मनिषा म्हैसकर, जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, परिविक्षाधीन जिल्हाधिकारी संजिता महोपात्रा, प्रांताधिकारी वंदना खरमाळे, तहसिलदार अजय पाटणे, पर्टयन महामंडळाचे दीपक माने, डॉ. सारंग कुलकर्णी आदी उपस्थित होते.
मंत्री ठाकरे म्हणाले, जिल्ह्यात रोजगार निर्मिती झाली पाहिजे, उद्योग आले पाहिजेत. पण त्यामुळे कोकणच्या निसर्ग सौंदर्यामध्ये कोणतीही बाधा आली नाही पाहिजे. कोकण हा निसर्ग संपन्न आहे. विकास करत असताना त्याचे सौंदर्य कोठेही कमी होऊ देणार नाही. जिल्ह्याच्या पर्यटनासाठी येथे कृषी पर्यटनासाठी प्रयत्न केले जातील.
तारकर्ली, मालवण, देवबाग येथे मोठ्या प्रमाणावर होम स्टे आहेत. त्यांच्या विकासासाठी धोरण निश्चित करण्यात येणार आहे. मंदिरांसाठी अध्यात्मिक पर्यटनाचा विकासही केला जाईल. तसेच बीच सॅक्स धोरणही राबवण्यात येत आहे. यासर्वांच्या माध्यमातून कोकणात रोजगार निर्मितीसोबतच शाश्वत विकास साधता येईल. पर्यटनासाठी पायाभूत सुविधांचा विकास करण्यावर भर देण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील स्कुबा डायव्हिंगला चालना मिळण्याच्या दृष्टीने देवबाग, तारकर्ली येथे आणण्यात आलेल्या अत्याधुनिक स्कुबा बोटीचे उद्घाटन पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी बोटीसह स्कुबा डायव्हिंगची सविस्तर माहिती घेतली. त्यानंतर इंन्स्टिट्यूट ऑफ स्कुबा डायव्हिंग ॲन्ड ॲक्वेटिक स्पोर्ट्स येथे स्कुबा डायव्हिंगच्या प्रात्यक्षिकांची त्यांनी पहाणी केली.