सिंधुदुर्ग विमानतळाला बॅ. नाथ पै यांचे नाव देण्याला विधीमंडळाची मंजुरी, जन्मशताब्दी वर्षातच सन्मान
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2022 11:51 AM2022-12-27T11:51:58+5:302022-12-27T11:52:28+5:30
ते संसदेत भाषण करण्यास उभे राहिले की, तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हेही भाषण ऐकण्यास थांबत असत.
नागपूर : सिंधुदुर्ग येथील विमानतळाला ‘बॅ. नाथ पै विमानतळ, सिंधुदुर्ग’ असे नाव देण्याची शिफारस केंद्र सरकारला करणारा ठराव सोमवारी विधिमंडळात एकमताने मंजूर करण्यात आला.
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत हा ठराव मांडला. हा ठराव केंद्र सरकारकडे पाठवला जाणार आहे. सध्या हे विमानतळ चिपी विमानतळाच्या नावाने ओळखले जात आहे.
बॅरिस्टर नाथ पै हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ल्याचे सुपुत्र होते. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात सरकारने त्यांचा केलेला हा सन्मान आहे. नाथ पै यांचे विमानतळाला नाव देण्याची मागणी सर्व पक्षांनी केली होती. राज्य मंत्रिमंडळातही याबाबतचा ठराव मंजूर करण्यात आला होता. विधानसभेतील मंजुरीनंतर विधान परिषदेतही हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.
बेळगाव कर्मभूमी
नाथ पै यांनी स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला होता. त्यांना यासाठी अनेक वेळा कारावास भोगावा लागला. गोवा मुक्ती संग्रामातही ते अग्रभागी होते. स्वातंत्र्यानंतर त्यांनी राजापूर लोकसभा मतदारसंघातून प्रतिनिधित्व केले होते. कोकण रेल्वेच्या संकल्पनेत त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते.
ते संसदेत भाषण करण्यास उभे राहिले की, तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हेही भाषण ऐकण्यास थांबत असत. कर्नाटकामधील मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात त्यांनी तीव्र लढा दिला होता. बेळगाव ही त्यांची कर्मभूमी मानली जात असे.