आंबोली वनविभागाची पाण्यासाठी सुरू असलेली वणवण अखेर संपली, उपवनसंरक्षकांनी लढवली शक्कल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2022 06:20 PM2022-05-26T18:20:32+5:302022-05-26T18:21:07+5:30
आंबोलीत चेरापुंनंतरचा सर्वाधिक पाऊस पडत असतो. पण येथे ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागते.
अनंत जाधव
सावंतवाडी : गेल्या अनेक वर्षांपासून वनविभागाला आंबोलीत पाण्यासाठी वणवण करावी लागत होती. कोणताही प्रकल्प राबवला तरी तो पाण्याअभावी वाया जात होता. याची दखल घेत उपवनसंरक्षक शहाजी नारनवर यांनी गंभीर दखल घेत नैसर्गिक पाण्याचे स्रोतातून थेट पाइपलाइनने हे पाणी नाममात्र खर्चात वनविभागाच्या आवारात आणले. उपवनसंरक्षकांच्या या एका निर्णयाने वनविभाग पाण्यात स्वयंपूर्ण झाल्याचे दिसून आले आहे.
आंबोलीत चेरापुंनंतरचा सर्वाधिक पाऊस पडत असतो. पण येथे ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. गेली अनेक वर्षे तर येथील वनविभाग पाण्यासाठी वणवण करत होता. येथे दरवर्षी कोट्यवधी रुपये हे वेगवेगळ्या विकासकामासाठी खर्च होत असतात; पण हे सर्व प्रकल्प पाण्याअभावी पडून राहात किंवा खर्च तरी वाया जातो.
येथील फुलपाखरू गार्डनवर तर दोन वेळा खर्च करण्यात आला. मात्र उन्हाळ्यात हे गार्डन करपून गेले, असे अनेक प्रकल्प आहेत. तत्कालीन अधिकाऱ्यांनी पाण्यासाठी केलेल्या उपाययोजना ही तुटपुंज्या ठरल्या. त्यामुळे आलेल्या अधिकाऱ्यांनी प्रकल्पाकडे लक्ष दिले; पण पाण्याकडे लक्षच दिले नाही.
मात्र सध्याचे उपवनसंरक्षक शहाजी नारनवर हे त्याला अपवाद ठरले असून, त्यानी आंबोलीतील निसर्गाचा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला. तसेच कायमस्वरूपी पाण्यासाठी काय करता येईल याकडे लक्ष दिले. त्यावेळी त्यांच्या लक्षात आले की आंबोलीत नैसर्गिक पाणी स्त्रोत भरपूर आहेत मग त्यातून पाणी आणले तर मोठा खर्चही येणार नाही.
म्हणून त्यांनी तेथील परिक्षित पॉइंट येथे पाण्याच्या असलेल्या झऱ्याला पाइपलाइन टाकून ते पाणी थेट आंबोली वनबागेत आणण्यात आले. तब्बल दीड किलोमीटरची पाइपलाइन आहे. या एका निर्णयामुळे आंबोलीतील वनविभागाची पाण्यासाठी होणारी वणवण कायमस्वरूपी सुटली आहे. वनविभाग पाणीप्रश्नात कायमस्वरूपी स्वयंपूर्ण बनला आहे. उपवनसंरक्षक नारनवर यांनी घेतलेला एक निर्णय फायदेशीर ठरलाच, शिवाय शासनाचे कोट्यवधीचे नुकसानही टळले आहे.
कमी खर्चाचा, कायमस्वरूपी टिकणारा प्रयोगआंबोलीत अनेक प्रकल्प आम्ही करत होतो. पण पाणी नसल्याने हे. प्रकल्प काही दिवसातच बंद पडत होते. पाण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करण्यात आले. पण हे सर्व प्रयोग तुटपुंजे ठरले. मात्र हा प्रयोग कमी खर्चाचा असून, कायमस्वरूपी टिकणारा आहे. - शहाजी नारनवर, उपवनसंरक्षक, सिंधुदुर्ग