'ती' अमेरिकन महिला योग शिक्षण घेण्यासाठी भारतात; तपासासाठी पोलिस पथके गोवा, तामिळनाडूकडे रवाना 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 12:07 PM2024-07-30T12:07:32+5:302024-07-30T12:08:42+5:30

अमेरिकन दूतावासाकडून गंभीर दखल

The American woman who was found chained in the forest went to India to study yoga | 'ती' अमेरिकन महिला योग शिक्षण घेण्यासाठी भारतात; तपासासाठी पोलिस पथके गोवा, तामिळनाडूकडे रवाना 

'ती' अमेरिकन महिला योग शिक्षण घेण्यासाठी भारतात; तपासासाठी पोलिस पथके गोवा, तामिळनाडूकडे रवाना 

बांदा (जि. सिंधुदुर्ग) : रोणापाल-साेनुर्ली सीमेवरील जंगलात शनिवारी लोखंडी साखळदंडाने बांधलेल्या स्थितीत सापडलेली अमेरिकन महिला ललिता कायी कुमार एस ही उच्चशिक्षित असून, ती योगाचे पुढील शिक्षण घेण्यासाठी दहा वर्षांपूर्वी भारतात तामिळनाडू येथे आली होती. त्यापूर्वी ती अमेरिकेत प्रसिद्ध बॅले डान्सर व योगशिक्षक होती. मात्र, ती तामिळनाडू येथून रोणापाल येथील जंगलात कशी पोहोचली, याचा तपास करण्याचे आव्हान बांदा पोलिसांसमोर आहे.

दरम्यान या महिलेला अधिक उपचारासाठी पोलिस बंदोबस्तात रविवारी दुपारी गोवा मेडिकल कॉलेज (गोमेकाँ) रुग्णालयात हलविण्यात आले. पोलिस तपासात अनेक गोष्टींचा उलगडा झाला आहे. तिच्याकडे मोबाइल, टॅब होता. टॅबमधील माहिती मिळण्यासाठी हा टॅब सायबर विभागाकडे पाठविला आहे. या प्रकरणात अमेरिकन दूतावासाने जलद गतीने तपास करण्याची विनंती भारत सरकारला केल्याने पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली आहेत. अधिक तपासासाठी सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण व बांदा पोलिस पथके गोवा व तामिळनाडू येथे रवाना केली आहेत.

या महिलेने कागदावर इंग्रजी भाषेतून लिहून देत आपल्यावर पतीने अत्याचार करून घातक व चुकीची औषधे दिली व या ठिकाणी जंगलात आपल्याला बांधून ठेवल्याची माहिती दिली होती. प्राथमिक माहितीनुसार पोलिसांनी तपास सुरू केला. मात्र, प्रकृती अस्वास्थ्यामुळे असंदिग्ध माहिती ती देत असल्याने पोलिसांसमोर माहिती मिळविण्याचे आव्हान होते.

घटनेची अमेरिकन दूतावासाकडून गंभीर दखल

जंगलात सापडलेली महिला ही अमेरिकन नागरिक असल्याने या घटनेची अमेरिकन दूतावासाने गंभीर दखल घेतली आहे. यासंदर्भात भारत सरकारशी संपर्क साधून या प्रकरणाची चौकशी जलद गतीने करण्याची मागणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर या प्रकरणाची दखल घेतल्याने पोलिसांवर तपासाचा दबाव वाढला आहे.

गुन्हे अन्वेषण शाखेकडून साहित्य जप्त

घटनास्थळी विदेशी महिलेकडे सॅक, मोबाइल, टॅब व ३१ हजार रुपये रोख सापडले. त्यामुळे ही घटना चोरीच्या उद्देशाने झाली नसल्याचा प्राथमिक निष्कर्ष पोलिसांनी काढला. तिची मोबाइलची बॅटरी उतरल्याने अधिक माहिती मिळू शकली नाही. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने सर्व साहित्य जप्त केले असून, मोबाइल व टॅब सायबर विभागाकडे वर्ग केला आहे.

Web Title: The American woman who was found chained in the forest went to India to study yoga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.