Sindhudurg: पावसाच्या सरी, सोसाट्याचा वारा अन् धुक्याची पळापळ; भुईबावडा घाटातील सौंदर्य खुलले

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: June 18, 2024 01:54 PM2024-06-18T13:54:50+5:302024-06-18T13:54:50+5:30

वर्षा पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची गर्दी 

The beauty of Bhuibawda Ghat, tourists flock to enjoy summer tourism  | Sindhudurg: पावसाच्या सरी, सोसाट्याचा वारा अन् धुक्याची पळापळ; भुईबावडा घाटातील सौंदर्य खुलले

(छाया : परेश कांबळी)

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गातून घाटमाथ्यावर जाण्यासाठी चार घाट मार्ग आहेत. त्यापैकी आंबोली, फोंडा आणि करूळ या घाटांचा सर्वाधिक वापर होता. तर भुईबावडा घाटाला काहीसा दुर्लक्षितच राहिलेला आहे. मात्र, गेले दोन महिने करूळ घाटात रूंदीकरणाचे काम सुरू असल्याने भुईबावडा घाटातून वाहतूक वाढली आहे. निसर्गप्रेमींसाठी सध्या भुईबावडा घाटातील सौंदर्य खुलले असून पावसाळ्याच्या सुरूवातीलाच विशेषत: कोल्हापूर-राधानगरी परिसरातून या घाटात वर्षा पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी पहायला मिळत आहे.
 
कमी रहदारी, निसर्गसंपन्न प्रदेश, ठिकठिकाणी संततधार पडणारे धबधबे आणि दाट धुक्यांच्या सानिध्यातील हा घाट सौंदर्याच्या बाबतीत थोडा उजवाच आहे. सिंधुदुर्गातून जाताना खारेपाटणच्या अलिकडे मुंबई गोवा महामार्गावरून रस्ता आहे. तर वैभववाडी तालुक्यातून गगनबावडा घाटात जातानाही थोडीशी वाट वाकडी करून भुईबावडा घाटातून जाता येते. घाटाची लांबी अवघी ९ किलोमीटर असली तरी नैसर्गिक विविधतेमुळे घाटाचे सौंदर्य अधिकच खुलून जाते. भुईबावडा घाटातील निसर्गसौंदर्याचे ड्रोनच्या सहायाने टिपलेले छायाचित्र लक्ष वेधून घेत आहे.

छोट्या मोठ्या धबधब्याच्या साथीने पुढे जाताना खडकांच्या कपारीत मोठा धबधबा आणि लगेच छोटे जलप्रवाह आपले स्वागत करतात. या ठिकाणी पार्किंगसाठीही विस्तीर्ण जागा आहे. रस्त्यासाठी फोडलेल्या खडकांमधून जागोजागे पाणी वाहते. थंडगार पाण्यात बसून अगदी सुरक्षितपणे धबधब्याखाली भिजण्याचा आनंद लुटता येतो. घाटमाथा जसजसा जवळ येवू लागतो तशी धुक्याची चादर अधिकच दाट होते. पावसाच्या सरी, सोसाट्याचा वारा आणि धुक्याची पळापळ पाहताना एक वेगळाच आनंद घेता येतो. भुईभावडा घाट सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या एका टोकाला असला तरी अलिकडे वर्षा पर्यटनासाठी त्याला पसंती मिळत आहे.

धुके कमी असले तरी श्री गगनगिरी मठाचे विहंगम दृश्य या घाटातून पहायला मिळते. सिंधुदुर्गातून सुरू होणारा हा रस्ता गगनबावडा एसटी बसस्थानकाजवळ येवून पोहोचतो. संपूर्ण घाटरस्त्याची ही सैर अवघ्या ३० ते ४० किलोमीटरमध्ये पूर्ण करता येते. घाट संपल्यानंतर ऐनारी या गावामध्ये गुहादेखील पाहता येते.

Web Title: The beauty of Bhuibawda Ghat, tourists flock to enjoy summer tourism 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.