पाकिस्तानमधील पक्ष्याला राजस्थानमध्ये सुखरुप सोडले! देवगडमध्ये आढळला होता पक्षी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2022 12:40 PM2022-12-28T12:40:54+5:302022-12-28T12:41:55+5:30

देवगड ,मुणगे येथे आढळला होता तो पक्षी 

The bird in Pakistan was left safely in Rajasthan | पाकिस्तानमधील पक्ष्याला राजस्थानमध्ये सुखरुप सोडले! देवगडमध्ये आढळला होता पक्षी

पाकिस्तानमधील पक्ष्याला राजस्थानमध्ये सुखरुप सोडले! देवगडमध्ये आढळला होता पक्षी

googlenewsNext

कणकवली:  देवगड तालुक्यातील मुणगे येथील संजय बांबुळकर यांना त्यांच्या बागेमध्ये १० नोव्हेंबर रोजी एक पक्षी आढळून आला.  त्याची पाहणी केली असता त्याच्या दोन्ही पायांना विशिष्ट प्रकारचा टॅग असल्याचे दिसून आले. त्यांनी वनविभागाकडे संपर्क साधून त्या पक्षाबद्दल माहिती दिली. त्यानंतर प्रशासकीय सोपस्कार पूर्ण करून त्या पक्षाला राजस्थानमध्ये सुखरुप सोडण्यात आले.

त्या पक्षाबाबत माहिती मिळताच देवगड वनपाल व मिठबाव वनरक्षक यांनी तत्काळ जागेवर जावून त्या पक्षास ताब्यात घेऊन मानद वन्यजीव रक्षक प्रा. नागेश दप्तरदार यांच्या समवेत पक्षाची पाहणी केली. तो पक्षी अशक्त असल्यामुळे ताब्यात घेऊन कणकवली येथे आणून त्याच्यावर पशु वैद्यकीय अधिकारी व वनविभागाच्या पशु वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत वैद्यकीय उपचार केले. पक्षाच्या दोन्ही पायात असणाऱ्या टॅगची पाहणी केली असता अबुधाबी (UAE) असे लिहिल्याचे दिसून आले.

त्यामुळे देवगड वनपाल यांनी वनक्षेत्रपाल कणकवली यांच्यामार्फत व उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी यांच्याशी संपर्क साधून त्यांना संपूर्ण माहिती दिली. त्यानुसार उपवनसंरक्षक यांनी व  प्रा. नागेश दप्तरदार यांनी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री ऑफ सोसायटी, मुंबई या संस्थेतील विविध संशोधकांशी संपर्क साधून त्या पक्षाबाबत माहिती घेतली. त्यावेळी तो पक्षी होबारा बस्टर्ड (Houbara Bustard) या नावाचा असल्याचे समजून आले. त्याबाबत अधिक चौकशी केली असता तो पक्षी पाकिस्तानतून संशोधनासाठी सोडल्याचे समजले.

त्या पक्षास उपवनसंरक्षक व कणकवली वनक्षेत्रपाल यांच्या मार्गदर्शनाखाली व वैद्यकीय निगराणीखाली १ महिना ठेवल्यानंतर तो पक्षी वैद्यकीय तपासणीत सक्षम असल्याचे समजल्यानंतर त्यास त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्याच्या हालचाली वनविभागाकडून सुरु झाल्या. उपवनसंरक्षक यांनी मुख्य वनसंरक्षक कोल्हापुर तसेच राजस्थानातील वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधुन त्या पक्षास पाकिस्तानच्या सीमेवर सोडणेबाबत चर्चा करुन तशी आवश्यक ती परवानगी मिळविण्याबाबत प्रयत्न केले. ती प्राप्त होताच वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरो मुंबई यांच्याशी संपर्क साधून पक्षास राजस्थान राज्यातील उपवनसंरक्षक, वन्यजीव विभाग जैसलमेर येथे सोडण्याबाबत हालचाली सुरु झाल्या.

१२ डिसेंबर रोजी राजस्थान राज्यातील उपवनसंरक्षक, वन्यजीव विभाग जैसलमेर यांच्याकडून परवानगी प्राप्त होताच वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरो मुंबई यांच्याकडून त्या पक्षाच्या प्रवासाबाबत सर्व प्रक्रिया पूर्ण केली. उपवनसंरक्षक यांच्या आदेशाअन्वये देवगड वनपाल सारीक फकीर व वनमजूर दिपक बागवे यांच्या समवेत त्या पक्षास घेवून पाकिस्तानच्या सीमेवर असणाऱ्या राजस्थान राज्यातील उपवनसंरक्षक, वन्यजीव विभाग जैसलमेर यांच्या कार्यालयात १५ डिसेंबर रोजी दाखल झाले. तिथे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे त्याला सुपुर्द केले. त्यानंतर त्या पक्ष्यास राजस्थान वन्यजीव विभागाच्यावतीने नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

Web Title: The bird in Pakistan was left safely in Rajasthan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.