तिलारी घाटात ब्रेक निकामी झाला, मालवाहू पिकअप कार शंभर फूट खोल दरीत कोसळली; अन् मोठा अनर्थ टळला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2022 06:48 PM2022-12-28T18:48:58+5:302022-12-28T18:49:18+5:30
गाडी दरीत कोसळत असल्याचा अंदाज आल्याने चालक व वाचकाने गाडीतून उड्या घेतल्या
संदेश देसाई
दोडामार्ग : तिलारी घाटात ब्रेक निकामी झाल्याने टोमॅटोची वाहतूक करणाऱ्या बोलेरो पिकअपला अपघात झाला. गाडी शंभर फूट खोल दरीत कोसळली. सुदैवाने गाडी झाडाला अडकल्याने मोठा अनर्थ टळला. गाडीचे व टोमॅटोचे मोठे नुकसान झाले असले तरी चालक व वाहक बालबाल बचावले. हा अपघात आज, बुधवारी पहाटेच्या सुमारास झाला.
तिलारी घाट अतिशय तीव्र उतार व नागमोडी वळणाचा आहे. चालकाला वळणाचा अंदाज येत नसल्याने छोटे मोठे अनेक अपघात होत आहेत. या घाटातून वाहने हाकत असताना तारेवरची कसरत करावी लागते. रात्री अपरात्री ब्रॉयलर कोंबडी तसेच भाजी पाल्याची वाहतुक मोठया प्रमाणात होत असते. आज, बुधवारी पहाटेच्या सुमारास महिंद्रा बोलेरो पिकअप घाट माथ्यावरून गोव्याच्या दिशेने टोमॅटोची वाहतूक करीत होता. हा टोमॅटो पणजी भाजी मंडईकडे घेवून निघाला होता.
घाट उतरत असताना पिकअपचा ब्रेक निकामी झाला. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून गाडी सुमारे १०० फूट दरीत कोसळली. झाडाला गाडी अडकल्याने हजार फूट दरीत कोसळण्यापासून बचावली. गाडी दरीत कोसळत असल्याचा अंदाज आल्याने चालक व वाचकाने गाडीतून उड्या घेतल्या. केवळ दैव बलवत्तर म्हणून चालक व वाहक सुखरूप बचावले.