Sindhudurg: जानवलीत पादचाऱ्याला धडक देऊन पसार झालेला कारचालक अखेर पोलिसांच्या ताब्यात
By सुधीर राणे | Published: May 23, 2024 12:42 PM2024-05-23T12:42:17+5:302024-05-23T12:44:06+5:30
धडकेत अनिल कदम यांचा जागीच मृत्यू झाला होता
कणकवली: जानवली येथे मुंबई-गोवा महामार्गावर अनिल कदम यांना धडक देऊन कारसह पसार झालेल्या चालकाला अखेर कणकवली पोलिसांनी पुणे येथून ताब्यात घेतले आहे.
कणकवली पोलिस निरीक्षक समशेर तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रवींद्र शेगडे व त्यांचे पथक या कारसह चालकाच्या शोधात होते. या पथकामार्फत शोध मोहीम सुरू असताना पुणे,निगडी येथे ही कार सापडली. तसेच संशयित आरोपीलाही त्याच भागातून ताब्यात घेण्यात आले आहे. अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली. मात्र, तपासात अडथळा येवू नये म्हणून संशयित चालकाचे नाव सांगण्यास त्यांनी नकार दिला.
जानवली येथील अनिल कदम यांना कारची धडक बसल्याने ते गंभीर जखमी झाले होते. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. यानंतर दुसऱ्या दिवशीच जानवली ग्रामस्थांनी रास्ता रोको करत पोलिसांच्या कार्यक्षमते बाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. मात्र, पोलिसांनी संबंधित कारचा शोध सुरू असून लवकरच कारचालकासहित कार ताब्यात घेतली जाईल, अशी ग्वाही दिली होती. आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी तब्बल दीड तासाहून अधिक काळ रास्ता रोको करून आपल्या मागण्या लावून धरल्या होत्या. अखेर तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांच्या मध्यस्थीने मार्ग निघाला होता.
त्यानंतर कणकवली पोलिसांचे पथक या कारच्या मागावर होते. सीसीटीव्हीच्या माध्यमातून शोध घेण्यात येत होता. पुणे येथे ही कार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. कणकवली पोलिसांचे पथक पुण्याला जात त्यांनी तेथेच असलेल्या चालकासहीत कार ताब्यात घेतली आहे. पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.