Sindhudurg: आंगणेवाडी भराडी देवीच्या यात्रेची तारीख ठरली, दक्षिण कोकणातील प्रतिपंढरपूर म्हणून ओळख
By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: December 12, 2024 17:23 IST2024-12-12T17:18:34+5:302024-12-12T17:23:05+5:30
देवीला कौल लावून ठरली तारीख

Sindhudurg: आंगणेवाडी भराडी देवीच्या यात्रेची तारीख ठरली, दक्षिण कोकणातील प्रतिपंढरपूर म्हणून ओळख
मालवण : नवसाला पावणारी अशी ख्याती सर्वदूर परसलेल्या आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील श्री देवी भराडीमातेचा वार्षिकोत्सव आंगणेवाडीची जत्रा शनिवार २२ फेब्रुवारी रोजी होणार आहे. आज गुरुवार १२ रोजी सकाळी देवीच्या यात्रेची तारीख निश्चित करण्यात आली आहे. अशी माहिती आंगणे कुटुंबीय आंगणेवाडी यांनी दिली. दक्षिण कोकणातील प्रतिपंढरपूर म्हणून या यात्रेची ओळख बनली आहे.
दरवर्षी प्रथेप्रमाणे धार्मिक कार्यक्रम व देवीचा कौल घेऊन वार्षिक उत्सवाची (जत्रेची) तारीख निश्चित होते. त्यानुसार यात्रेची तारीख निश्चित करण्यात आली आहे. महाराष्ट्रातीलच नव्हे तर देश-परदेशात कोकणातील ज्या एका जत्रेचं आकर्षण आहे. दरवर्षी लाखो भाविकांच्या गर्दीमध्ये मोठ्या उत्साहात भराडी देवीची जत्रा रंगते. मालवणमधील मसुरे गावातील आंगणेवाडीतल्या भराडी देवीच्या यात्रेला मुंबईतून मोठ्या संख्येने चाकरमानी दाखल होत असतात. त्यासोबतच विविध पक्षाचे राजकीय नेते या यात्रेत सहभागी होतात.
दरवर्षी सुमारे पाच ते सात लाख भाविक भराडी देवीच्या दर्शनासाठी दरवर्षी सुमारे पाच ते सात लाख भाविक भराडी देवीच्या दर्शनासाठी केवळ दीड दिवसांच्या जत्रेमध्ये सहभागी होतात. आंगणेवाडीच्या भराडी देवीचा नैवेद्य खास असतो. आंगणे कुटुंबियांच्या माहेरवाशिणी तो अबोल राहून करतात. या जत्रेमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक भाविकाला त्याचा लाभ घेता येतो.
नवसाला पावणारी भराडी देवी
मसुरे गावच्या या आंगणेवाडीच्या या वाडीत केवळ आंगणे कुटुंबीयांची ही देवी आहे. तसा फलक आंगणे कुटुंबीयांचं खासगी मंदिर म्हणून फलक लावला आहे. मात्र नवसाला पावणारी देवी अशी ख्याती असल्याने देवीचं सर्वांसाठी दर्शन खुले असते. भाविकांच्या गर्दी आणि श्रद्धेसाठी ते इतर सर्व भाविकांना खुले असते. गाऱ्हाणं आणि नवस बोलून अनेक भाविक आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी भराडीदेवीचं दर्शन घेतात.