काजू बी दरावरून उद्भवलेला वाद अखेर क्षमला, दीपक केसरकरांची मध्यस्थी
By अनंत खं.जाधव | Published: April 13, 2024 01:11 PM2024-04-13T13:11:14+5:302024-04-13T13:11:49+5:30
सावंतवाडी : काजूदरावरून निर्माण झालेला वाद अखेर मिटला असून 120 रूपये काजू बी खरेदी तसेच शासनाचे दहा रुपयांचे अनुदान ...
सावंतवाडी : काजूदरावरून निर्माण झालेला वाद अखेर मिटला असून 120 रूपये काजू बी खरेदी तसेच शासनाचे दहा रुपयांचे अनुदान असे मिळून 130 रुपये दर काजू बागायतदारांना देण्यात येणार आहे तसा निर्णय घेण्यात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर व जिल्हा बॅक अध्यक्ष मनिष दळवी यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी सिंधुदुर्ग शेतकरी फळबागायतदार संघाचे अध्यक्ष विलास सावंत उपस्थित होते.
सिंधुदुर्गातील काजू बी ला स्वामीनाथन आयोगाच्या धर्तीवर 197 रुपये दर मिळावा अशी मागणी सिंधुदुर्ग शेतकरी व फळबागातदार संघाच्या वतीने लावून देण्यात आली होती. काही वर्ष काजू बिला आवश्यक दर मिळत नसल्याने ही मागणी लावून धरण्यात आली होती. मात्र याबाबत काहीच तडजोड होत नसल्याने शेतकरी गेले कित्येक दिवस नाराज होते त्यांनी या संदर्भात आक्रमक भूमिका घेतली होती दराबाबतचा निर्माण झालेला हा तिढा सोडवण्यासाठी केसरकर यांनी पुढाकार घेतला होता.
शासनाकडूनही काजू बी ला दहा रुपये दरामागे अनुदान देण्याचे जाहीर केले. मात्र या संदर्भात ठोस निर्णय झाला नव्हता. त्यामुळे शेतकरी फळबागायतदार संघामध्ये नाराजी होती. शेतकरी व फळबागायतदार संघ व कारखानदार यांची बैठक मंत्री केसरकर यांनी सावंतवाडीत बोलावले होते या बैठकीमध्ये काजू बागायतदार यांची नाराजी दूर करत त्यांना शासनाचे अनुदान पकडून 130 रुपये दर देण्याचे निश्चित करण्यात आले.
यासंदर्भात केसरकर म्हणाले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कारखानदारांकडून शेतकऱ्यांची काजू बी खरेदी करताना बाजारपेठेत 110 रुपये दर असलेला काजू 115 रुपये तर 115 रुपये दर असलेला काजू 120 रुपये आले विकत घेण्याचे मान्य केले या दरामागे शासनाकडून मिळण्यात येणारे दहा रुपयाचे अनुदानही देण्यात येणार आहे त्यामुळे 115 रुपयाच्या रुपयांच्या काजूला 120 रुपये तर 120 रुपयाच्या काजुला 130 रुपये दर मिळणार आहे हा दर उद्यापासून काजू बागायतदारांना देण्यात येईल तर शासनाकडून जाहीर करण्यात आलेले अनुदान आचारसंहिता संपल्यानंतर शेतकऱ्यांना देण्यात येईल असे स्पष्ट केले.
या बैठकीला कारखानदार संघटनेचे अध्यक्ष सुरेश भाऊ लेकर, बिपिन वरस्कर, सुधीर झाटये, बापू पोकळे, परशुराम वारंग, दीपक ठाकूर, सूर्यकांत गवस, सिद्धेश शिरोडकर, सुरेश नेरुळकर, विनिता शिरोडकर तर बागायदारांमध्ये संजय देसाई, राकेश धरणे, आकाश नरसुले, निलेश सावंत, अभिलाष देसाई, प्रदीप सावंत, जगदेव गवस, घनश्याम नाईक, जनार्दन नाईक उपस्थित होते.