हत्ती हटाव मोहीम पावसाळ्यानंतर राबविणार, वाढीव नुकसान भरपाईसाठी शासन प्रयत्नशील - मंत्री केसरकर
By अनंत खं.जाधव | Published: September 11, 2023 05:30 PM2023-09-11T17:30:02+5:302023-09-11T18:03:34+5:30
सावंतवाडीत विशेष बैठक
सावंतवाडी : हत्ती तसेच अन्य वन्य प्राण्यांनी मोठ्याप्रमाणात शेती बागायतीची नुकसानी केली असून त्याची नुकसान भरपाई वाढीवून देण्याबाबत शासन प्रयत्नशील आहे. लवकरच याबाबत शासन निर्णय घेतला जाणार आहे. तसेच हत्तींचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी पावसाळ्यानंतर विशेष मोहीम राबवण्यात येईल असे आश्वासन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिले आहे.
दोडामार्ग तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात हत्ती व वन्य प्राण्यांकडून शेती बागायतींचे होणारे नुकसान लक्षात घेता मंत्री केसरकर यांनी सोमवारी येथील वनविभागाच्या कार्यालयात हत्ती हटाव समितीचे प्रमुख तसेच शेतकरी बांधवांसोबत वाढीव नुकसान भरपाई संदर्भात बैठक आयोजित केली होती. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, उपवनसंरक्षक एस नवकिशोर रेड्डी, माजी आमदार राजन तेली, प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर तहसिलदार श्रीधर पाटील उपस्थित होते.
यावेळी झालेल्या चर्चेत शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त फळझाडांना वाढीव नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. यात नारळ हे पीक जास्त करून कोकणामध्ये अधिक असल्याने त्यासाठी वेगळा निकष ठेवून जास्त नुकसान भरपाई देण्याचे सुचवले. हत्ती लहान नारळाच्या झाडांचे जास्त नुकसान करतो. त्यामुळे झाडाच्या वयोमानानुसार नुकसान भरपाई नको तर सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.
तर ज्याप्रमाणे एखाद्या वेळी वनविभागाच्या हद्दीतील झाडांची तोड झाल्यावर शेतकऱ्याला जी शिक्षा होते, त्याप्रमाणे वन्य प्राण्यांकडून शेतकऱ्यांच्या झाडाचे नुकसान केल्यास त्यानुसार नुकसान भरपाई मिळावी असेही मागणी करण्यात आली. यावेळी शेतकऱ्यांनी केलेल्या सूचनांचा विचार करता मंत्री केसरकर यांनी मोठ्या झाडाला तीस हजार रुपये तर लहान झाडाला पंधरा हजार रुपये नुकसान भरपाई बाबत एकमत केले. तसेच दिवाळी नंतर हत्ती हटाव मोहीम राबविण्यात येईल असेही यावेळी स्पष्ट केले.
या बैठकीला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अशोक दळवी, दोडामार्ग तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, प्रेमानंद देसाई, राजू निंबाळकर, शैलेश दळवी,जिल्हा बँक संचालक रवींद्र मडगावकर, हत्तीबाधीत समितीचे सदस्य पंकज गवस, संतोष गवस, विष्णू देसाई, गोपाळ गवस,यांच्यासह हत्ती बाधित गावातील शेतकरी उपस्थित होते.