खवय्यांसाठी खुशखबर! फळाचा राजा मार्केटमध्ये दाखल, देवगड हापूसची पहिली पेटी वाशीत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2022 05:53 PM2022-11-24T17:53:56+5:302022-11-24T17:58:50+5:30
चार कलमांवरती मिळालेल्या आंब्याचे पहिले फळ काढत देवगड हापूसची पहिली पेटी आज मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी काढून शुभमुहूर्त केला.
अयोध्याप्रसाद गावकर
देवगड : देवगड तालुक्यातील कातवण येथील आंबा बागायतदार दिनेश दीपक शिंदे व प्रशांत सीताराम शिंदे या दोन युवकांनी आपल्या बागेतील हापूसचे पीक चांगल्या पद्धतीने घेऊन देवदिवाळी व मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारचा मुहूर्त साधून आंबा काढण्याचा शुभारंभ केला. पहिली दोन डझनांची पेटी नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यातच मुंबई वाशी मार्केट येथील सुप्रसिद्ध व्यापारी अशोक हांडे यांच्या पेढीवर पाठविण्यात आली. सकाळी आठ वाजता आंबे काढून या पेटीच्या शुभारंभ करण्यात आला.
कातवण येतील आंबा बागायतदार प्रशांत शिंदे व दिनेश शिंदे यांच्या गोरक्ष गणपती मंदिर याठिकाणी असलेल्या घरानजीकच्या बागेत असलेल्या हापूसच्या कलमांना १५ ऑगस्ट पासूनच मोहर येण्यास सुरुवात झाली होती. मात्र काही कलमावरील आलेला मोहर गळून पडला. चार ते पाच कलमावरील मोहोर तसाच टिकून राहिला आणि तो टिकवण्यासाठी या शिंदे बंधूंनी खूप मेहनत घेतली. त्यामुळेच या चार कलमांवरती मिळालेल्या आंब्याचे पहिले फळ काढत देवगड हापूसची पहिली पेटी आज मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी काढून शुभमुहूर्त केला.
त्या पेटीची विधिवत पूजा करून ही पेटी वाशी येथे जाण्यासाठी रवाना झाली स्वतः आंबा बागायतदार शिंदे हे ही आंबा पेटी घेऊन वाशी मार्केटला रवाना झाले आहेत. आमदार नितेश राणे यांनी देखील या दोन्ही शिंदे युवा बंधूंचे कौतुक केले आहे. यावेळी आंबा बागायतदार दीपकचंद्र शिंदे, दिनेश शिंदे, प्रशांत शिंदे,नरेश डामरी, पप्पू लाड आदी उपस्थित होते.
सात ते आठ हजारांचा भाव मिळण्याचा अंदाज
या दोन डझनच्या आंबा पेटीला साधारणतः सात ते आठ हजारच्या आसपास भाव मिळेल असा अंदाज शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. मात्र यावर्षी आंबा सिझन पाहता अजूनही हापूसच्या कलमांना पालवीच येत आहे. अशावेळी हापूसच्या कलमांची योग्य निगा राखत पहिली पेटी या दोन युवा आंबा बागायदारांनी पाठविली आहे.