कणकवलीतील उड्डाणपुलाला भालचंद्र महाराजांचे नाव
By सुधीर राणे | Published: January 29, 2024 12:16 PM2024-01-29T12:16:33+5:302024-01-29T12:16:52+5:30
कणकवली: मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण अंतर्गत कणकवली शहरातून गेलेल्या उड्डाणपुलाला अखेर परमहंस भालचंद्र महाराज उड्डाणपूल असे नाव देण्यात आले आहे. ...
कणकवली: मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण अंतर्गत कणकवली शहरातून गेलेल्या उड्डाणपुलाला अखेर परमहंस भालचंद्र महाराज उड्डाणपूल असे नाव देण्यात आले आहे. परमहंस भालचंद्र महाराजांचा जन्मोत्सव सोहळा सुरू असताना कणकवलीवासीयांकडून सोमवारी पहाटेच्या सुमारास हे नामकरण करण्यात आले.
कणकवली येथील अप्पासाहेब पटवर्धन चौकामध्ये बाजारपेठकडे येणाऱ्या रस्त्याच्या दिशेने हा नामकरण फलक लावण्यात आला आहे. या फलकावर परमहंस भालचंद्र महाराज यांच्यासह अप्पासाहेब पटवर्धन यांचे छायाचित्र व श्री स्वयंभू, रवळनाथ या ग्रामदेवतांचे नाव देखील आहे. कणकवली शहरातील महामार्ग उड्डाण पुलाला भालचंद्र महाराज यांच्या सोबतच अप्पासाहेब पटवर्धन यांचे नाव देण्याची ही मागणी काही वर्ष सुरू होती. अद्यापपर्यंत या उड्डाणपुलाला नाव देण्या बाबत केवळ चर्चा झालेल्या असताना प्रशासकीय पातळीवरून याबाबत कोणत्याही हालचाली होत नव्हत्या.
दरम्यान, सोमवारी कणकवली शहरात पहाटे घडलेली ही घटना चर्चेचा विषय बनली आहे. रविवारी रात्रीपासूनच याबाबतची कुजबूज कणकवली शहरात चालू होती. त्यानंतर सोमवारी सकाळी भालचंद्र महाराज यांच्या नावाने उड्डाणपूलाचे नामकरण करण्यात आले. त्यामुळे कणकवली शहरातील उड्डाणपूल आता यापुढे भालचंद्र महाराज उड्डाणपूल या नावाने ओळखले जाणार आहे.
कणकवली शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा यापूर्वी अनेकदा स्थलांतरित करण्याबाबत चर्चा झाल्या होत्या. हा पुतळा देखील पहाटे चार वाजण्याच्या सुमारास स्थलांतरित करण्यात आला होता. गेली अनेक वर्ष सुरू असलेला हा प्रलंबित प्रश्न महायुतीच्या सत्ता स्थापनेनंतर चुटकीसरशी सुटला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा कणकवली शहरात पहाटेच्या प्रहरी ही एक महत्त्वपूर्ण घटना घडल्याने कणकवलीच्या इतिहासात या पहाटेची पुन्हा एकदा वैशिष्ट्यपूर्ण अशी नोंद होणार आहे.