Sindhudurg News: फासकीत अडकलेल्या बिबट्याची केली सुटका, ग्रामस्थांची सतर्कता, अज्ञाताविरोधात गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2023 03:52 PM2023-02-03T15:52:04+5:302023-02-03T15:52:25+5:30
फसकी लावणाऱ्या व्यक्तीचा वन विभाग शोध घेणार
आचरा : आचरा पारवाडी येथे शिकाऱ्याच्या फासकीत अडकलेल्या बिबट्याला स्थानिक ग्रामस्थ आणि वन विभागाच्या रेस्क्यू पथकाने दीड तासांनी सुटका करत पिंजऱ्यात जेरबंद केले. ही घटना बुधवारी १० वाजण्याच्या सुमारास ग्रामस्थांच्या निदर्शनास आली. बिबट्या मादी जातीचा असून दीड ते दोन वर्षाचा असल्याचे वनाधिकारी यांनी सांगितले.
आचरा पुलानजीक असलेल्या पारवाडी येथे एका कुंपणात बुधवारी रात्री १० वाजण्याच्या संशयास्पद हालचाल होत असल्याचे दिसून आली. कुंपणाच्या दिशेने ग्रामस्थांनी लाईटचा प्रकाशझोत टाकला असता बिबटा फासकीत अडकल्याचे दिसून आले. ग्रामस्थांनी पत्रकार अर्जुन बापर्डेकर आणि आचरा पोलिस ठाण्याशी संपर्क साधत माहिती दिली. बापर्डेकर यांनी मालवणचे वनपाल श्रीकृष्ण परीट यांना माहिती दिली.
वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच कुडाळहून रेस्क्यू पथक घटनास्थळी दाखल होत शिताफीने बिबट्याची सुटका केली. या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये वनविभागचे सावंतवाडीचे सहायक वनसंरक्षक अमृत शिंदे, सावंतवाडी वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर, मालवण वनक्षेत्रपाल श्रीकृष्ण परीट, वनपाल धुळुप कोळेकर, वनपाल सावळा कांबळे, शरद कांबळे, कर्मचारी अनिल परब, राहुल मयेकर यांचा समावेश होता.
फासकीत अडकलेल्या बिबटा बिथरला होता, त्यातच बघ्यांची गर्दी वाढू लागल्याने आचरा पोलिस ठाण्याचे हवालदार बबन पडवळ, अभिताज भाबल यांनी ग्रामस्थांना आवाहन करत गर्दीवर नियंत्रण मिळवले. शेवटी फासात अडकलेल्या बिबट्याला पिंजऱ्यात ढकलत जेरबंद केले. या मोहिमेत उपस्थित असलेल्या पारवाडी ग्रामस्थांचेही मोलाचे सहकार्य वनविभागाला लाभले.
वनविभागाकडून शोध
कुंपणात शिकारी करण्याच्या उद्देशाने फास लावल्याप्रकरणी अज्ञातावर वन्यजीव संरक्षण अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसकी लावणाऱ्या व्यक्तीचा वन विभागाकडून कसून शोध घेतला जाणार आहे. फासकीसह विहिरीमध्ये वन्यप्राणी आढळून आल्यास वनविभागाला माहिती द्या, असे वनपरिक्षेत्र अधिकारी अमृत शिंदे यांनी स्पष्ट केले.