सिंधुदुर्ग किल्ल्याचा महादरवाजा उघडणार, पर्यटकांना १ सप्टेंबरपासून प्रवेश मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2023 12:19 PM2023-08-28T12:19:46+5:302023-08-28T12:20:14+5:30

पर्यटकांची प्रतीक्षा संपली, मुख्य प्रवेशद्वारासह तटबंदीची होणार दुरुस्ती

The gates of Sindhudurg Fort will be opened from September 1 | सिंधुदुर्ग किल्ल्याचा महादरवाजा उघडणार, पर्यटकांना १ सप्टेंबरपासून प्रवेश मिळणार

सिंधुदुर्ग किल्ल्याचा महादरवाजा उघडणार, पर्यटकांना १ सप्टेंबरपासून प्रवेश मिळणार

googlenewsNext

संदीप बोडवे

मालवण (सिंधुदुर्ग) : मालवण तालुक्यातील वायरी भूतनाथ ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्याचे दरवाजे १ सप्टेंबरपासून उघडले जाणार आहेत. पावसाळ्यात शासनाकडून सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पर्यटकांना किल्ल्यावर प्रवेश बंदी केलेली असते. या दरम्यान किल्ले प्रवासी होडी वाहतूकही बंद असते. आता लवकरच किल्ल्याचे दरवाजे खुले होणार असल्यामुळे पर्यटकांची प्रतीक्षा संपणार आहे. दरम्यान, सिंधुदुर्ग किल्ल्याच्या डागडुजीचेही काम पुरातत्त्व विभागाने हाती घेतले असून लवकरच किल्ल्याचे रूप पालटल्याचे आपणास पाहावयास मिळणार आहे.

सिंधुदुर्ग किल्ल्याला दरवर्षी लाखो पर्यटक भेट देत असतात. किल्ल्यावर जाण्यासाठी मालवण येथील मुख्य जेटीवरून मोठ्या नौकेत बसून समुद्रातून प्रवास करावा लागतो. हा एक वेगळाच अनुभव असतो. पर्यटकांच्या आगमनामुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होतो.

लवकरच किल्ल्याचे रूप पालटणार....

सिंधुदुर्ग किल्ल्याच्या डागडुजीचे प्रस्ताव पुरातत्त्व विभागासमोर आहेत. यानुसार किल्ल्याचा महादरवाजा, दिंडी दरवाजा, ढासळलेली तटबंदी आणि त्यावरील पायवाट, किल्ल्यावरील पायवाटा आदी कामांची प्रामुख्याने दुरुस्ती होणार आहे. तटबंदीवरील झाडी सफाईचे काम लवकरच हाती घेतले जाणार आहे. - वैभव बेटकर, अधिकारी पुरातत्त्व विभाग

किल्ल्याला मिळणार नवीन महादरवाजा

सिंधुदुर्ग किल्ल्याचा महादरवाजा कालौघात जीर्ण झाला आहे. हा दरवाजा बदलून नवीन दरवाजा बसविण्याचा प्रस्ताव पुरातत्त्व विभागासमोर आहे. यानुसार किल्ल्याचा महादरवाजा, त्यामधील दिंडी दरवाजा पूर्णतः बदलून नवीन दरवाजा बसविण्यात येणार आहे. नवीन दरवाजा तयार करताना जुन्या दरवाजाची हुबेहूब प्रतिकृती असेल याची काळजी घेतली जाणार आहे.

समुद्र बऱ्यापैकी शांत झाला आहे. १ सप्टेंबरपासून महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या परवानगीने रीतसर किल्ला प्रवासी होडी वाहतूक सुरू होणार आहे. किल्ला प्रवासी आणि पर्यटकांना सुरक्षित सेवा देण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. - मंगेश सावंत, अध्यक्ष किल्ला प्रवासी होडी वाहतूक संघटना

Web Title: The gates of Sindhudurg Fort will be opened from September 1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.