३१ डिसेंबरला सरकार कोसळणार, आदित्य ठाकरेंचे भाकित

By अनंत खं.जाधव | Published: November 23, 2023 05:05 PM2023-11-23T17:05:17+5:302023-11-23T17:07:06+5:30

..त्यामुळे राज्यात निवडणूक घ्यायला हे सरकार तयार नाही

The government will collapse on December 31., Yuva Sena chief Aditya Thackeray prediction | ३१ डिसेंबरला सरकार कोसळणार, आदित्य ठाकरेंचे भाकित

३१ डिसेंबरला सरकार कोसळणार, आदित्य ठाकरेंचे भाकित

सावंतवाडी : युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंनीसिंधुदुर्ग जिल्ह्यातून खळा बैठकीचा उपक्रम राबवत थेट सत्ताधाऱ्यांवर शाब्दिक हल्ला चढवला. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील सरकार 31 डिसेंबरला कोसळणार असल्याचे भाकित केले. तसेच लोकशाही विरोधी असलेले हे सरकार निवडणुका घेण्यास घाबरत असल्याचा आरोपही केला.

आदित्य ठाकरे हे गुरूवारी सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी माजगाव येथे उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार व कोलगाव येथे उपतालुका प्रमुख मायकल डिसोझा याच्या घरासमोर खळा बैठका घेत उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी खासदार विनायक राऊत आमदार, वैभव नाईक, पदवीधर मतदार संघाचे प्रमुख किशोर जैन, युवा सेनेचे वरुण सरदेसाई जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

शिवसेना ठाकरे गटाकडून प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यात खळा बैठक घेण्यात येत आहे. कोकणात घराच्या समोरील अंगणाला खळा म्हणतात आणि परिसरातील शंभर ते दिडशे लोकांना एकत्र करून बैठक घेण्यात येते तशीच बैठक गुरूवारी आदित्य ठाकरे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोडामार्ग व सावंतवाडी येथे घेतली.

यावेळी ठाकरे म्हणाले, पुढील वर्षात पदवीधर मतदार संघाची निवडणूक होत आहे. ही निवडणूक आपणास जिंकायची असल्यास पदाधिकाऱ्यांनी जबाबदारी घेऊन काम करणे गरजेचे आहे. घराघरात पोहोचून तेथील पदवीधरांना नोंदणी करण्यास भाग पाडावे. याआधी आम्ही काही मतांनी पडलो परंतु आता पुन्हा एकदा नव्या जिद्दीने आणि ताकदीने या निवडणुकीला सर्वानी मिळून सामोरे जाऊया असे आवाहनही केले.

कोकणी जनतेने शिवसेनेला नेहमीच भरभरून प्रतिसाद दिला आहे. येथील लोकांचे पाठबळ अद्भुत आहे याच लोकांच्या पाठबळाच्या जीवावर पुन्हा एकदा कोकणात आणि मुंबईमध्ये ही पदवीधर निवडणुकीमध्ये शिवसेनेचा भगवा निश्चितच फडकणार असेही ठाकरे म्हणाले.

सत्ताधाऱ्यांच्या मनात भीती 

महाराष्ट्र ज्या ताकदीने महाविकास आघाडीच्या पाठीशी उभा आहे ते पाहता सत्ताधाऱ्यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्यात निवडणूक घ्यायला हे सरकार तयार नाही. लोकशाहीचा गळा घोटून सत्तेत आलेले खोके सरकार हे 31 डिसेंबरला कोसळणार असल्याचे भाकीतही व्यक्त केले. या वेळी खासदार विनायक राऊत यांनी ही उपस्थितांना मार्गदर्शन केले.

Web Title: The government will collapse on December 31., Yuva Sena chief Aditya Thackeray prediction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.