सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनाशी मांडलेला खेळ पालकमंत्र्यांनी रोखावा..!; ‘हा’ अधिकारी कुणाला नकोसा ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 12:05 IST2025-01-22T12:04:55+5:302025-01-22T12:05:42+5:30
५०० कोटींचे जलपर्यटन प्रकल्पांचे भवितव्य अंधारात

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनाशी मांडलेला खेळ पालकमंत्र्यांनी रोखावा..!; ‘हा’ अधिकारी कुणाला नकोसा ?
संदीप बोडवे
मालवण : प्रशासनाअंतर्गत राजकारणातून सुरू झालेला आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या भवितव्याशी खेळला जाणारा एक खेळ नूतन पालकमंत्र्यांनी रोखण्याचे द्रष्टेपण दाखवण्याचा प्रसंग आज उभा ठाकला आहे. देशातील पहिल्या पर्यटन जिल्ह्याचे प्रणेते खासदार नारायण राणे यांचे पर्यटनविषयक व्हिजन घेऊन १४ वर्षे जलपर्यटनाच्या माध्यमातून कार्यरत असणारे डॉ. सारंग कुलकर्णी यांचा प्रशासनांतर्गत राजकारणातून बळी घेण्याचा प्रयत्न चालला आहे.
सागरी जलक्रीडा अणि स्कुबा डायव्हिंगच्या माध्यमातून या जिल्ह्याच्या किनारी पर्यटनाचा चेहरा-मोहरा बदलणारे अधिकारी सारंग कुलकर्णी यांची सन्मानाने पुन्हा एमटीडीसीच्या जलपर्यटन सल्लागार पदावर नियुक्ती व्हावी, यातच सिंधुदुर्गच्या पर्यटन विकासाचे हित आहे. नामदार नितेश राणे यांनी पालकमंत्री म्हणून कार्यभार हाती घेताच विकासाचे प्रस्ताव सादर करा, असे जनतेला आवाहन केले आहे. देशातील उभारता पर्यटन जिल्हा म्हणून सिंधुदुर्गच्या पर्यटन क्षेत्राकडून नूतन पालकमंत्र्यांकडे हा पहिला प्रस्ताव आहे.
डॉ. सारंग कुलकर्णी यांचे कार्य.. एका दृष्टिक्षेपात..!
- मालवणच्या समुद्राखालचे अद्भुत विश्व आणि भारताचे ग्रेट बॅरियार रीफ म्हणून ओळखले जाणाऱ्या आंग्रिया बँकेला जगासमोर आणण्यात सिंहाचा वाटा.
- समुद्री संसाधने, सागरी शास्त्र, किनारपट्टीवरील जनजीवनाचा दांडगा अनुभव व अभ्यास असल्याने कोकणवासीयांची कित्येक वर्षांपासूनची मागणी असलेल्या देशातील पहिल्या समर्पित सागरी विद्यापीठाचा अहवाल तयार करण्याची जबाबदारी.
- जागतिक दर्जाच्या सी वर्ल्ड प्रकल्पाची तसेच तारकर्ली येथील भारतीतील पाहिले इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्कुबा डायव्हिंग अँड ॲक्वाटिक स्पोर्ट्स (ईसदा) ची संकल्पना.
- सर्वदूर पर्यटन या महाराष्ट्र सरकारच्या संकल्पनेतून नाशिक, कोयना, गोसीखुर्द, नावगाव खैरी, उजनी येथे साहसी जलपर्यटनाचे प्रकल्प मोठ्या दिमाखात सुरू.
५०० कोटींचे जलपर्यटन प्रकल्पांचे भवितव्य अंधारात
डॉ. कुलकर्णी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे महाराष्ट्रातील तब्बल ५०० कोटींच्या जलपर्यटन प्रकल्पांचे भवितव्य अंधारात सापडले आहे. डॉ. सारंग कुलकर्णी यांच्या देखरेखीखाली अत्याधुनिक संशोधन, नियोजन व अंमलबजावणी करत केंद्राच्या वित्त मंत्रालयाने अत्यंत कठोर परीक्षण प्रक्रियेद्वारे मंजूर केलेले सिंधुदुर्गातील पाणबुडी आणि निवृत्त युद्धनौका गुलदारचे अंडरवॉटर म्युझियम, आर्टिफिशियल रीफ हे प्रकल्प लटकण्याची भीती निर्माण झाली आहे.
पर्यटनाच्या अधिकाऱ्यांचे मौन..
संबंधित घटनेबाबत पर्यटन सचिव अतुल पाटणे, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक मनोज कुमार सूर्यवंशी व एमटीडीसीचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जैस्वाल यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता अधिकाऱ्यांनी यावर बोलणे टाळले.